भटिंडा : भटिंडा सैन्य तळावर झालेल्या गोळीबारात चार जवानांचा मृत्यू झाला होता. हा दहशतवादी हल्ला आहे की नाही? या दृष्टीने तपास करण्यात येत होता. दरम्यान या हल्ल्याप्रकरणी लष्कराच्या उच्च पदस्थ अधिकार्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन त्या संपूर्ण घटनेची माहिती दिली. वैयक्तिक कारणांमुळे गनर देसाई मोहन याने आपल्याच चार साथीदारांची गोळ्या झाडून हत्या केली आहे. चौकशीदरम्यान, आरोपीने आपला गुन्हाही कबूल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पंजाबमधील भटिंडा मिलिट्री स्टेशनमध्ये झालेल्या गोळीबारात चार जवानांना प्राण गमवावे लागले होते. या प्रकरणी पोलिसांनी लष्कराच्या एका जवानाला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान तोफखाना युनिटचा गनर देसाई मोहन याने पोलिसांसमोर इन्सास रायफल चोरल्याचा आणि आपल्या ४ सहकारी सैनिकांची हत्या केल्याचा गुन्हा कबूल केला आहे. वैयक्तिक वैमनस्यातून ही घटना घडल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.
आरोपीच्या कबुलीजबाबानुसार, ९ एप्रिल रोजी आरोपीने रायफल आणि काडतुसे चोरली होती. नंतर १२ एप्रिल रोजी पहाटे ४.३० वाजता ड्युटीवर असताना त्याने झोपेत असलेल्या चार जवानांवर गोळीबार केला. या घटनेनंतर त्याने रायफल आणि सात गोळ्या कँटोन्मेंटमध्ये गटाराच्या खड्ड्यात फेकल्या. मृत जवानांनी आरोपीवर अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे. याच रागातून आरोपीने हे कृत्य घडवून आणले.