जळगाव : जिल्ह्यात 12 बाजार समित्याच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. यंदाच्या बाजार समितीत पहिल्यांदाच काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट व राष्ट्रवादी काँग्रेस ही तीनही पक्ष महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोर जात आहेत. शिंदे गटात फूट पडल्यानंतर जिल्ह्यात पाच आमदार जे शिंदे गटाला जाऊन मिळाले होते त्यानंतर राज्यात भाजप-शिंदे गट युतीतील सत्ता स्थापन झाली. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश बाजार समित्यांमध्ये भाजप-शिंदे गटाविरोधात महाविकास आघाडी असाच सामना रंगत असल्याचे पाहायला मिळत आहे.
या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, भाजपचे नेते तथा मंत्री गिरीश महाजन व शिवसेना शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
जिल्ह्यातील जळगाव, अमळनेर, पाचोरा,बोदवड, यावल, धरणगाव आणि भुसावळ, रावेर, चोपडा, चाळीसगाव, पारोळा, जामनेर या 12 बाजार समितीसाठी आज 28 एप्रिल रोजी मतदान होत आहे. एकाच दिवशी मतदान झाले असले तरी मतमोजणी मात्र दोन टप्प्यात होणार आहे. यात उद्या 29 एप्रिल रोजी भुसावळ, रावेर, चोपडा, चाळीसगाव, पारोळा,जामनेर या सहा बाजार समितीची मतमोजणी होणार आहे. तर 30 एप्रिल रोजी रोजी जळगाव, अमळनेर, पाचोरा, बोदवड, यावल, धरणगाव या सहा बाजार समित्यांची मतमोजणी होणार आहे.
मतदान केंद्रावर गोंधळ
जळगावातील नुतन मराठा महाविद्यालयाच्या केंद्रावर हमाल मापाडी मतदारसंघाचे उमेदवार उमेदवारांसह कार्यकर्त्यांनी आक्षेप घेत बोगस मतदार मतदान करत असल्याचा आरोप केला. यामुळे या केंद्रावर काही काळ गोंधळ झाला. या निवडणुकीत हमाल मापाडी कामगारांनी मतदानावर बहिष्कार टाकल्याचे हे दिसून आले. शिंदे गटाकडून बोगस मतदान केल्याचा आरोपही यावेळी हमाल मापाडी मतदारसंघाचे उमेदवार देवेन सोनवणे यांच्याकडून करण्यात आला. दरम्यान, प्रत्येकाचे मतदान कार्ड तपासूनच मतदान करण्यासाठी प्रवेश दिला जात असून असा कुठलाही प्रकार या ठिकाणी घडलेल्या नसल्याचे निवडणूक अधिकारी संतोष बिडवई यांनी सांगितले. तसेच आक्षेप असल्यास याचिका दाखल करावी, त्यावर निर्णय घेतला जाईल असंही त्यांनी सांगितलं.