भारतीय संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा अपेक्षेप्रमाणे खराब ठरला. 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाला 3-1 असा पराभव पत्करावा लागला. या मालिकेदरम्यान ड्रेसिंग रूममध्ये झालेल्या वादाविषयी आणि कर्णधार रोहित शर्मा व मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यातील मतभेदांच्या चर्चा जोरदार सुरू होत्या. या वादांच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे.
राजीव शुक्ला यांनी रोहित शर्मा व गौतम गंभीर यांच्यात कोणतेही मतभेद नसल्याचे ठामपणे सांगितले.
शुक्ला म्हणाले, ‘हे पूर्णपणे चुकीचे विधान आहे. निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर, प्रशिक्षक गौतम गंभीर आणि कर्णधार रोहित शर्मा यांच्यात कोणताही वाद वा मतभेद नाही. मीडियामध्ये पसरवले जाणारे हे सगळे दावे निराधार आहेत.’
रोहित शर्माच्या फॉर्मबाबत समर्थन
ऑस्ट्रेलिया मालिकेत खराब फॉर्ममुळे रोहित शर्मा टीकेचा केंद्रबिंदू ठरला. त्याने तीन सामन्यांत फक्त 31 धावा केल्या होत्या. गंभीरने वरिष्ठ खेळाडूंना अल्टीमेटम दिल्याच्या अफवा होत्या. यावर शुक्ला यांनी रोहितच्या बाजूने भूमिका घेतली. ‘फॉर्म हा खेळाचा भाग आहे. रोहितने स्वतःच्या खराब फॉर्ममुळे पाचव्या कसोटीतून बाहेर राहण्याचा निर्णय घेतला, यामागे कोणताही दबाव नव्हता,’ असे शुक्ला म्हणाले.
संघाच्या कामगिरीचे मूल्यांकन
राजीव शुक्ला यांनी सांगितले की, बीसीसीआयने नुकतीच संघाच्या कामगिरीचे मूल्यमापन करण्यासाठी बैठक घेतली. ‘संघ पुढे कसा प्रगती करू शकेल, यावर सखोल चर्चा झाली. आम्ही चांगल्या कामगिरीसाठी योग्य योजना आखत आहोत,’ असे त्यांनी स्पष्ट केले.