किशोरआप्पा जरा भान ठेवा…!

तरुण भारत लाईव्ह । चंद्रशेखर जोशी ।  लोकप्रतिनिधींसाठी आचासंहिता असणे आवश्यक आहे… हे पुन्हा एकदा पाचोर्‍यातील प्रकरणावरून स्पष्ट झाले आहे. पाचोर्‍यात गेल्या आठवठ्यात एक घटना घडली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात तेथील पत्रकार संदिप महाजन यांनी एक वृत्त दिले होते. मुख्यमंत्र्यांच्या जवळ जाण्यास एक चांगली संधी आहे हे हेरून पाचोरा-भडगाव मतदार संघाचे आमदार किशोर पाटील यांनी संबंधीत पत्रकारास फोन लावून त्याला धमकी देत अतिशय अर्वाच्च शब्दात शिवीगाळ केली. विविध माध्यमांवर या संदर्भात ते संभाषण आले… पत्रकारीतेतील आचार संहिता जपत काही माध्यमांनी आमदार किशोर पाटील यांना त्यांची भूमिका विचारली असता त्यांनी ‘हो मी शिवीगाळ केली’ अशी कबुलीही दिली. याबाबतीत त्यांनी प्रामाणिकपणा दाखविला पण या प्रकारावरून त्यांची केवळ जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात नाचक्की झाली हे निश्चित..

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर कोणी पहिल्यांदा टिका केली असे नाही. किंवा किशोर आप्पांचे  नेते असलेल्या पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावरही बर्‍याचदा टिका झाली. गुलाबराव हे तर किशोर पाटील यांच्यापेक्षा निश्चितच आक्रमक आहे हे संपूर्ण राज्य जाणते पण त्यांनी कधीही कोणत्याही टिकाकाराला शिविगाळ केली नाही आणि पत्रकारांना तर कधीच नाही. मात्र आपण आपल्या नेत्याचे किती समर्थक आहोत हे दाखविण्याच्या प्रयत्नात किशोर आप्पा हे आपण एक जबाबदार लोकप्रतिनिधी आहोत… संयमाने वागले पाहीजे… या सार्‍याला तिलांजली देत एखाद्या गल्लीतील दादाप्रमाणे भाषा करत अर्वाच्च शिविगाळ केली.

वास्तविक पाचोरा-भडगाव मतदार संघातील भडगाव  तालुक्यातल्या गोंडगाव येथे गेल्या महिन्याच्या शेवटी घडलेली घटना माणूसकीला काळीमा फासणारी ठरली आहे. अवघ्या सात वर्षीय बालिकेवर अत्याचार करून तिची हत्त्या करण्याचा अमानवी प्रकार येथे घडल्याने जनमानसात संताप होणे साहजिकच आहे. या प्रकाराचे गांभीर्य पूर्वी कायदा व सुव्यस्थेची परिस्थिती हातळलेल्या म्हणजेच पोलीस असलेल्या किशोर पाटील यांना चांगली अवगत असणे आवश्यक आहे. मात्र त्यांनी याचे भान ठेवले नाही.

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी तणावाची परिस्थिती लक्षात घेऊन थेट गोंडगाव गाठत पिडितेच्या कुटुंबियांचे सांत्वन केले व या घटनेचा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यात येईल अशी ग्वाही देत जनप्रक्षोभ कमी करण्याचा प्रयत्न केला. धुर्त व हुशार लोकप्रतिनिधीचे हे लक्षण होय…पण त्यांचेच सहकारी असलेल्या व कायद्याची चांगल्याप्रकारे जाण असलेल्या त्यांचा सहकारी अशा पद्धतीने हमरीतुमरीवर उतरून शिविगाळ करत असेल तर ते योग्य नाही. पाचोरा मतदार संघात वाढता विरोध लक्षात घेऊन किशोर पाटील यांची ही कृती तर नाही? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

एवढ्यावरच न थांबता त्यांच्या समर्थकांनी संबंधीत पत्रकाराला रस्त्यात गाठून बेदम मारहाण करणे कितपत योग्य आहे? जिल्ह्यात पत्रकार व लोकप्रतिनिधी यांच्यातील संघर्ष नवीन नाही. यापूर्वीही असे प्रकार घडले आहेत. एक प्रसंग आठवतो की माजी विधानसभा अध्यक्ष स्व. बाळासाहेब मधुकरराव चौधरी यांच्या साकेगाव येथील आयुर्वेद महाविद्यालयात एक वाद झाला होता. त्यावरून ‘तरूण भारत’मधुन प्रसिद्ध झालेल्या वृत्ताने स्व. बाळासाहेब नाराज झाले होते. मात्र त्यांनी हाती असलेल्या सत्तेचा वापर करून धमक्या न देता फोनवरून संपर्क साधुन चर्चा करण्यास आम्हाला बोलावले व सत्त्य काय? हे समजावून सांगत समाधान केले.

या सारख्या अनेक घटना घडत असतात. म्हणून पत्रकारास धरून ठोकून काढणे हा पर्याय होऊ शकत नाही.  ही बिहारी संस्कृती महाराष्ट्रात रूजवणे योग्य नाही. किशोर पाटील यांचे जे कोणी समर्थक असे प्रकार करत असतील त्यांच्यावर कडक कारवाई केली जाणे गरजेचे आहे अन्यथा हीच संस्कृती वाढत जाईल.