डिओड्रंट वापरत असाल तर सावधान, एका मुलीने गमावला जीव

युके : युकेमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. डिओड्रंट फवारल्यामुळं एका 14 वर्षांच्या मुलीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. जॉर्जिया ग्रीन वय १४ असे मयत मुलीचे नाव आहे. दरम्यान, या घटनेमुळे डिओड्रंट अथवा परफ्युम खरोखर सुरक्षित आहेत का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

सूत्रानुसार, युकेमध्ये राहणाऱ्या १४ वर्षीय जॉर्जिया ग्रीन या मुलीचा डिओड्रंटच्या अतिवापरामुळे मृत्यू झाला आहे. डिओड्रंटचा फवारा श्वासातून फुफुसात गेल्याने हार्ट अटॅकने तिचा मृत्यू झाल्याचं समोर आले आहे.

मागच्या वर्षी मे महिन्यात जॉर्जिया तिच्या खोलीत बेशुद्ध अवस्थेत आढळली होती. तिने नेमकं किती प्रमाणात डिओड्रंटचा स्प्रे मारला, हे कळू शकलं नाही. मात्र तिच्या पोस्ट मार्टम रिपोर्टवरही ‘द्रवपदार्थाचा फवारा’ असा उल्लेख असल्याची माहिती सूत्रानुसार समोर आली आहे.

दरम्यान, डिओड्रंट अथवा परफ्यूमचा स्प्रे करताना तो थेट नाक अथवा तोंडावाटे शरीराच्या आत गेल्यास श्वसननलिकेला त्रास होऊ शकतो, श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो, असं वैद्यकीय तज्ञांनी म्हटले आहे. एकट्या यूकेत ऑफिस ऑफ नॅशनल स्टॅटिस्टिकनुसार २००१ ते २०२० या काळात ‘डिओड्रंटमुळे’ ११ जणांचे मृत्यू झाल्याची नोंद आहे. मात्र प्रत्यक्षात हा आकडा खूप मोठा असण्याची शक्यता आहे.