---Advertisement---
जळगाव : जळगाव शहर आणि जिल्ह्यात एटीएम कार्ड बदलून फसवणूक करण्याचे प्रकार झाले असून, याचा फटका अनेक निष्पाप नागरिकांना, विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना बसत आहे. मदतीच्या बहाण्याने हे ठग तुमचे एटीएम कार्ड हातचलाखीने बदलून तुमच्या खात्यातून परस्पर पैसे काढून घेत आहेत.
गेल्या काही वर्षात जळगाव शहरात अशा फसवणुकीचे अनेक गुन्हे दाखल झाले आहेत. दोन वर्षापूर्वी तर जामनेरच्या एका पोलिस कर्मचाऱ्यालाही अशाच प्रकारे शहरात दहा हजार रुपयांना गंडा घालण्यात आला होता. त्यानंतरही शिवाजी पुतळ्यासमोरच्या एटीएममध्ये एका प्रौढ व्यक्तीला ३३ हजार ३०० रुपयांना फसविण्यात आले, तर चोपडा तालुक्यातील एका व्यक्तीच्या कार्डवरून तब्बल ४२ हजार ६८८ रुपयांची खरेदी करण्यात आली.
अनेकदा बदनामीच्या भीतीने किंवा कायदेशीर प्रक्रियेच्या त्रासामुळे नागरिक तक्रार दाखल करणे टाळतात, त्यामुळे अशा घटनांची नेमकी संख्या यापेक्षा कितीतरी जास्त असण्याची शक्यता आहे.
फसवणूक टाळण्यासाठी काय कराल ?
एटीएममध्ये पैसे काढताना कोणाही अनोळखी व्यक्तीची मदत घेऊ नका. तुम्हाला अडचण येत असल्यास, थेट बँकेच्या सुरक्षा रक्षकाची किंवा बँकेच्या कर्मचाऱ्याची मदत घ्या. फोटो काढा, पिन स्वतःच टाका अपवादात्मक परिस्थितीत मदत घेण्याची वेळ आल्यास, संबंधित व्यक्तीचा मोबाइलमध्ये फोटो काढून ठेवा. एटीएम मशीनमध्ये तुमचा पिन नंबर नेहमी तुम्हीच स्वतः डायल करा आणि तो कोणालाही दिसणार नाही याची खात्री करा. पैसे काढल्यानंतर मशीनमधून एटीएम कार्ड बाहेर आल्यावर ते तुमचेच कार्ड आहे आणि ते योग्य स्थितीत आहे, याची खात्री करून घ्या. एटीएममध्ये काही संशयास्पद हालचाल किंवा व्यक्ती दिसल्यास, तत्काळ तुमच्या जवळील लोकांना किंवा पोलिसांना कळवा, असे आवाहन जळगाव शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सागर शिंपी यांनी केले आहे.