तरुण भारत लाईव्ह । जळगाव : तरूण पिढीने जिद्द, धाडस ही वृत्ती अंगी बाळगून स्वत:वर विश्वास ठेवत जगाच्या पाठीवर कोठेही जाण्याची तयारी ठेवावी. निश्चितच यश प्राप्त होईल असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी केले.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात युवक व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार, उच्च व तंत्रशिक्षण विभाग महाराष्ट्र शासन आणि विद्यापीठाचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्यावतीने शनिवार दि. २२ जुलै रोजी G-20 युवा संवाद- भारत @2047 या संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यांचे उद्घाटन करतांना श्री. महाजन बोलत होते. कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते. पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, खा. रक्षा खडसे, आ. मंगेश चव्हाण प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी रा.से.यो. राज्य सल्लागार राजेश पांडे, प्र-कुलगुरू प्रा. एस.टी. इंगळे, व्य. प. सदस्य राजेंद्र नन्नवरे, जळगाव जिल्हा सहकारी दुध संघाचे व्यवस्थापकीय संचालक शैलेश मोरखाडे यांची मंचावर विशेष उपस्थिती होती.
यावेळी गिरीश महाजन म्हणाले की, राष्ट्रप्रेम हा शब्द जबाबदारीची जाणिव करून देणारा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाच्या विकासाचे स्वप्न बदलण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहेत. यासाठी विविध योजना शासनाकडून राबविल्या जात असून शेवटच्या माणसालाही मुख्य प्रवाहात आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. G-20 च्या निमित्ताने जगात भारताची मान उंचावली असून या संमेलनात सहभागी होणाऱ्या तरूणांनी स्वत:वर विश्वास ठेवण्याची गरज आहे. धाडस अंगी बाळगा, प्रामाणिकपणे काम करा, इतरांशी स्पर्धा करतांना आपली रेष मोठी करा, जिद्द ठेवा, व्यसनापासून अलिप्त रहा आणि जगात कुठेही जाण्याची तयारी ठेवा यश निश्चित मिळेल. असे सांगून मंत्री महाजन यांनी दोन दिवसांपूर्वी रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी या गावावर दरड कोसळल्यानंतर केलेल्या मदतकार्याचा अनुभव सांगितला. मुख्यमंत्र्यांचा फोन आल्यानंतर सव्वा तासात घटनास्थळी पोहचलो. सात कि.मी.चा डोंगर चढून गेलो त्यावेळी विदारक चित्र होते. वाडीला जातांना पाऊलवाट होती, लाईट नव्हते, मात्र स्थानिक आमदारासह काही जणांना घेऊन तिथे मदत केली. राजकारण ही सेवा आहे या वृत्तीतून आम्ही काम करतो असे ते म्हणाले.
पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, G-20 च्या निमित्ताने तरूणांना मोठे दालन उपलब्ध झाले आहे. जगाला भारताची गरज आहे. ग्रामिण आणि शहरी हा न्यूनगंड न बाळगता काम करा सोशल मिडीयाचा अतिरेक नको, वैयक्तिक आयुष्यात आम्ही सामुहिक पातळीवर शिस्तबध्द जगा असे आवाहन तरूणांना करतांना आम्हा राजकारणांचा जॉब फार कठीण आहे. दिवसभरात वेगवेगळ्या भूमिका कराव्या लागतात असे ते म्हणाले. विद्यापीठात जिल्हा नियोजन व विकास समितीच्या माध्यमातून बहिणाबाई चौधरी यांचा पुतळा उभारण्यासाठी एक कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले.
खा. रक्षा खडसे यांनी देशाच्या विेकासात तरूणांचा सहभाग फार महत्वाचा असल्याचे सांगून देशापुढील येणाऱ्या आव्हानांची चर्चा G-20 अंतर्गत होत आहे ती समजून घ्या असे आवाहन केले. आ. मंगेश चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना काळानुरूप स्वत:मध्ये बदल करा. येणाऱ्या अडचणींवर मात करा आणि विजयाचे शिल्पकार स्वत: व्हा असे आवाहन केले.
बीजभाषणात रा.से.यो.चे राज्य सल्लागार राजेश पांडे यांनी या संमेलनाविषयी सविस्तर भूमिका मांडली. पुढच्या १२ दिवसात राज्यातील सर्व विद्यापीठांमध्ये १५०० विद्यार्थ्यांचे हे संमेलन होणार आहे. असे एकूण २८ हजार विद्यार्थी या संमेलनातून तयार होतील आणि ते पुढे ते शंभर रा.से.यो. कार्यकर्त्यांना प्रत्येक महाविद्यालयात तयार करतील ९ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या कालावधीत प्रत्येक महाविद्यालयातील हे शंभर विद्यार्थी प्रत्येकी वीस विद्यार्थ्यांना भेटून पंचप्रण, रोजगार निर्मिती व इतर प्रश्नांविषयी सांगतील असे एकूण ४० लाख विद्यार्थ्यांपर्यंत हे पंचप्रण पोहचवण्याचा संकल्प करण्यात आला आहे. यातून देशाचे नेतृत्व करणारी तरूणाई निर्माण होईल. ही नव्या क्रांतीची सुरुवात आहे असे पांडे म्हणाले.
अध्यक्षीय भाषणात कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी यांनी जीवनात शिस्त, उत्तम संगत आणि प्रामाणिकपणाची सवय अंगीकारण्याचा सल्ला उपस्थित तरूणांना दिला. अभिमान आणि अहंकार यातील फरक ओळखून सृजणात्मकतेकडे वळावे अशी अपेक्षा व्यक्त केली. प्रास्ताविकात संमेलनाचे कार्याध्यक्ष तथा व्य.प.सदस्य राजेंद्र नन्नवरे यांनी देशात या प्रकारचे पहिले संमेलन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात होत असल्याचे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला दिलेल्या पंचप्रणाचा उलगडा केला. कार्यक्रमाचे सूत्र संचलन प्रा. आर.आर. राजपूत यांनी केले. कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांनी आभार मानले. उद्घाटनापुर्वी विद्यार्थी भवनापासून पदवी प्रदान सभागृहापर्यंत तिरंगा यात्रा काढण्यात आली. फुगे आकाशात सोडून या तिरंगा यात्रेचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी मंचावर व्य.प. सदस्य प्रा.शिवाजी पाटील, सुरेखा पालवे, समन्वयक अॅङ अमोल पाटील, नितीन झाल्टे, डॉ. पवित्रा पाटील, सह संचालक डॉ. सतोष चव्हाण, सीए रवींद्र पाटील, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक प्रा. योगेश पाटील, अधिसभा सदस्य विष्णू भंगाळे, रा.से.यो. संचालक डॉ. सचीन नांद्रे, विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. जे.डी. लेकुरवाळे हे उपस्थित होते. या कार्यक्रमास अधिसभा सदस्य, विद्यापरिषद सदस्य, प्राचार्य उपस्थित होते.
दुपारच्या सत्रात केशवस्मृती सेवा संस्थेचे अध्यक्ष भरत अमळकर यांच्या अध्यक्षतेखाली अमृतकाळातील पंचप्रण या मुख्य विषयातील विकसित भारत, गुलामगिरीच्या मानसिकतेतून मुक्ती, भारतीय वारशाचा अभिमान, एकात्मतेचे सामर्थ्य, नागरिकांचे कर्तव्ये या उपविषयांवर विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले. त्यामध्ये प्राची पाटील, रितेश काळे, उर्वी शिसोदे, वैभवी ढिवरे, चेतना निकुंभ, काजल चौधरी, हितेश्री पाटील, कल्याणी पाटील, सिध्दार्थ बागले, विजय लकडे, विवेक पाटील, अमोल पाटील, अश्विनी जाधव, ललित पाटील, धिरज जाधव, गौरी ढाके, वैष्णवी पाटील, वैभव पाटील, यश जगताप, प्रेरणा चौधरी, चौधरी साबा, गुणवंत बोरसे, गणेश पाटील, गौरव पाटील, रोशनी गाढे, सौरभ माळी, ज्ञानेश्वर थोरात, वासुदेव पाटील, खुशी माळी, अपुर्वा शहा या विद्यार्थ्याचा समावेश होता.