तरुण भारत लाईव्ह न्युज : मेरठ मध्ये आईच्या प्रेमालाही लाजवेल असे प्रकरण समोर आले आहे. आज जग २१ व्या शतकाकडे वाटचाल करीत असून अजूनही बऱ्याच ठिकाणी समाजात अंधश्रद्धा पसरलेली आहे. असाच अंधश्रद्धेचा एक भयानक प्रकार मेरठ मध्ये घडला . येथे एका आईने आपल्या 10 वर्षाच्या मुलाची आणि 6 वर्षाच्या मुलीची हत्या केली आहे. तांत्रिक शक्तीच्या लालसेपोटी या आईने केलेलं हे कृत्य अतिशय धक्कादायक आहे. आपल्या मुलांचा बळी देऊन भविष्यातील घडामोडी जाणून घेण्याचे सामर्थ्य तिला प्राप्त होईल असा भ्रम या स्त्रीला होता. याप्रकरणी मेरठ पोलिसांनी महिला, तिचा प्रियकर आणि शेजाऱ्यांसह सहा जणांना अटक केली आहे.
सविस्तर वृत्त –
आरोपी महिलेचे नाव निशा असे आहे. 20 वर्षांपूर्वी तिचे शाहिद नावाच्या व्यक्ती सोबत लग्न झाले होते. सध्या शाहिद एका बुटांच्या दुकानात काम करतो. निशाचे माजी पार्षद सौद फैजी सोबतही अवैध संबंध होते. निशा, तिचा प्रियकर आणि इतरांनी मिळून मुलगा मेराब (10 वर्षे) आणि मुलगी कोनेन (6 वर्षे) यांची हत्या केली.दोघांनी मिळून दोन्ही मुलांचे हात-पाय बांधले आणि कॉटच्या बॉक्स मध्ये कोंडून ठेवले. मुलांचा मृत्यू झाला नाही तर त्यांना विषाचे इंजेक्शन देण्यात आले. मुलीचा मृत्यू झाला, तर शेजाऱ्यांनी मुलाला मारण्यासाठी त्याचे हात पाय बांधले आणि तिचा प्रियकर सौद फैजी याने मुलाचा गळा दाबला. दोघांच्या मृत्यूनंतर मृतदेह दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या नाल्यात फेकून देण्यात आले .
बुधवारी सायंकाळी निशाची दोन्ही मुले बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांना मिळाली होती. शोध सुरू झाला. निशाचा फोन ट्रेस केला असता ती सौद फैजीच्या सतत संपर्कात असल्याचे आढळून आले. पोलिसांनी सौद फैजीची चौकशी केली असता तो फरार असल्याचे समोर आले. निशाला पोलिसी खाक्या दाखवताच तिने सर्व काही उघड केले. दरम्यान, सौद फैजीनेही आत्मसमर्पण करून संपूर्ण हत्याकांड उघड केले.
निशाबद्दल असे कळते की याआधीही तिच्या मुलांचा अकाली मृत्यू झाला होता. आता निशानेच त्यांची हत्या केली का याचा शोध घेतला जात आहे. निशाच्या पतीचे महिन्याचे उत्पन्न केवळ 15 हजार रुपये आहे, परंतु तिची दोन्ही मुले शहरातील महागड्या शाळेत शिकतात. निशाने पैसे दुप्पट करून देण्याच्या नावाखाली अनेकांची फसवणूक केल्याचाही तिच्यावर आरोप आहे.