Beed : मनोज जरांगेंची मोठी घोषणा! आझाद मैदानात 20 जानेवारीपासून करणार आमरण उपोषण

Beed :  मनोज जरांगे पाटील यांची बीडमध्ये इशारा सभा संपन्न झाली. या सभेमध्ये ठरल्याप्रमाणे मनोज जरांगे पाटील यांनी पुढील आंदोलनाची दिशा निश्चित केली आहे. २० जानेवारीला आझाद मैदानावर उपोषणाला बसण्याचा इशारा त्यांनी दिला.

बीडमधील सभेमध्ये बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मराठ्यांनी सहन किती दिवस करायचंय. सुरुवातीला तीन महिन्याचा वेळ घेतला. नंतर चाळीस दिवसांचा वेळ घेतला. आता पुन्हा २४ डिसेंबरपर्यंतचा वेळ घेतला होता. तारीख आणि दिशा आपल्याला ठरवायची आहे. लढायचं तर जिंकून यायचं आहे. गाफील वागायचं नाही. गाफीलपणामुळे समाजाचा घात होतो. फक्त डावं टाकले आहेत, त्यामुळे मी इथपर्यंत आलो आहे. बुद्धीला समाजाच्या शक्तीची जोड आहे.
आंदोलनाची दिशा निश्चित

”मुंबईत आझाद मैदानात २० जानेवारीपासून उपोषण करणार.. फक्त शांततेत जायचं आणि शांततेत यायचं. मी तुमच्या जीवावर आंदोलन करणार आहे. तुम्ही मला भेटायला मुंबईत यायचं. पिकाला पाणी द्या, कापसं वेचून घ्या, घरची सगळी कामं करा. आपण शेतकऱ्यांची पोरं आहोत.”

”मराठा समाजाला डाग लागला नाही पाहिजे. कुणी दंगा घालायला लागला, गाडी पेटवायला लागला तर त्याला तातडीने पोलिसांच्या ताब्यात द्यायचं. आजूबाजूला नीट लक्ष द्यायचं. मुंबईत गेल्यानंतर सरकारने आमच्या शौचाची व्यवस्था करायची आहे.”

कुणाला उचलून नेलं तर पोलिस ठाण्यात ठिय्या

”मराठ्यांच्या लेकरांना नोटिसा दिलेल्या आहेत. त्यांना उघडं पडू देऊ नका. जर कुणाला उचलून नेलं तर पोलिस ठाण्यात जावून बसायचं. तिथंच खायचं आणि झोपायचं. मराठे काय असतात ते २० जानेवारीला दिसेल. आपल्या आंदोलनाला गालबोट लागू द्यायचं नाही परंतु आरक्षण घेतल्याशिवाय माघारी फिरायचं नाही.”

”पोलिसांचा दोष नाही. वरचे नेते घोळ घालत आहेत. त्यांना पुन्हा निवडून द्यायचं नाही. जर तुमचे नेते मराठ्यांच्या पोरांच्या पाठीमागे उभे राहिले नाहीत तर त्यांच्यासाठी मराठ्यांचं घर बंद राहिल.”

सरकारला पुन्हा अल्टिमेटम

”सरकारने १० ते १२ दिवसात मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे. महाराष्ट्रातले सगळे मराठे मुंबईला येणार आहेत. कुणीही स्टंटबाजी करुन मध्येच आंदोलन करायचं नाही. मराठ्यांच्या सोबत चालायचं, वेगळेपण सिद्ध करायचं नाही. आता सगळ्यांनी आपापले नाटकं बंद करा.”

”मुंबई मला बघायला समाज येणार. मग तो ट्रॅक्टरने येऊ द्या नाहीतर रिक्षाने. कुणी नुसतं ट्रॅक्टर अडवू द्या.. मग बघतो. ट्रॅक्टर आमचं, डिझेल आमचं.. कुणी अडवलं तर त्याला मारु नका. त्याला ट्रॅक्टरमध्ये टाका आणि आंदोलनात घेऊन या. त्याल बेसन भाकरी खाऊ घाला. कांदे देऊ नका. कांदे खायला येवल्याच्या येड्याला राहू द्या.”

आरक्षण घेऊनच माघारी फिरणार

”मराठ्यांनी जर मुंबईकडे कूच केली तर हा विराट समुदाय माघारी फिरणार नाही. आरक्षण घेऊनच माघारी फिरणार, कुणाला आडवं यायचं ते येऊ द्या. आता देव जरी आडवा आला तरी मराठ्यांना आरक्षण द्यायचं आहे. मराठे दंड थोपटून तयार आहेत.”

शेवटी जरांगे पाटील म्हणाले की, मराठा मुंबईत गेले तर सगळे नेते आपापल्या गावी येतील. महिलांना आवाहन करतो की, आम्हाला तिकडे कुणी त्रास दिला तर आमदार आणि मंत्र्यांच्या घरी जावून बसायचं. तो निट आसामला गेला पाहिजे.