उधार बिअर मागणे पडले महागात; दुकान मालकाने चौघांसह ग्राहकाला बेदम चोपले!

धुळे : उधार बिअर मागितल्याने दुकान मालकाचा पारा चढला आणि त्याने आपल्या साथीदारांसह ग्राहकाला बेदम मारहाण केली. ही घटना शिरपूर तालुक्यातील हँद्रयापाडा येथे गुरुवारी (२३ जानेवारी) रात्री घडली. या प्रकरणी दुकान मालकासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुभाराम उत्तम पावरा (४७, रा. हँद्रयापाडा, ता. शिरपूर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ते गुरुवारी रात्री साडेआठच्या सुमारास हँद्रयापाड्यातील सनी वाइन शॉप येथे गेले होते. त्यांनी दुकानदाराकडे उधार बिअर मागितली. यामुळे दुकान मालकाला राग आला आणि त्याने आपल्या साथीदारांसह सुभाराम पावराला शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली.

हेही वाचा : बापरे ! दोन गेंड्यांसमोर माय-लेकी जिप्सीतून पडल्या खाली, काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ व्हायरल

मिळालेल्या माहितीनुसार, संजय पुरुषोत्तम जयस्वाल, सनी संजय जयस्वाल (दोघे रा. हँद्रयापाडा, ता. शिरपूर), पांड्या पावरा (रा. खंबाळे, ता. शिरपूर), तसेच मनीष सुरेश आणि करण (दोघांचे संपूर्ण नाव अद्याप स्पष्ट नाही, रा. निमराणी, मध्य प्रदेश) या चौघांनी सुभाराम पावराला मोटारसायकलीची चैन आणि लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली.

या मारहाणीत सुभाराम पावरा गंभीर जखमी झाले असून, त्यांनी शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार  दुकान मालकासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास शिरपूर तालुका पोलीस करत आहेत.