वेरूळ लेणीत मधमाशांचा पर्यटकांवर हल्ला; 15 ते 20 पर्यटक जखमी

तरुण भारत लाईव्ह । ९ एप्रिल २०२३। छत्रपती संभाजीनगर मधुन एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जगप्रसिद्ध वेरूळ लेणीत  मधमाशांनी शनिवारी दुपारी सव्वाबाराच्या सुमारास अचानक पर्यटकांवर हल्ला चढवला. ज्यात 15 ते 20  पर्यटक जखमी झाले आहे. तर सर्व जखमी पर्यटकांवर वेरूळ येथील रुग्णालयात उपचार करण्यात आले. विशेष म्हणजे वेरूळ लेणीच्या परिसरात पर्यटकांवर मधमाशांच्या हल्ल्याची गेल्या 15 वर्षांतील ही तिसरी घटना आहे.

सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, जगप्रसिद्ध वेरूळ लेणी पाहण्यासाठी शनिवार  वेरूळ लेणी पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची संख्या अधिक होती. दरम्यान 16 क्रमांकाची कैलास लेणी पाहत असताना अचानक आग्या मोहळाच्या माशांनी पर्यटकांवर हल्ला चढवला. त्यामुळे एकच धावपळ उडाली. अचानक झालेल्या आग्या मोहळाच्या हल्ल्याने पर्यटक आरडाओरडा करू लागले. तर प्रत्येकजण जीव मुठीत धरून सैरावैरा पळू लागले. तर मधमाशांच्या हल्ल्यात पर्यटक रघुनंदन कडापा, कार्तिका कडापा, स्पंदना कडापा, सहाना कड़ापा, पलानीस्वामी, रेखा कुमारी यांच्यासह 15  ते 20 पर्यटक जखमी झाले.

मधमाशांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या पर्यटकांना वेरूळ येथील शेख आसिफ, संजय बनकर, भास्कर घाडगे, मनोज मडकर यांनी तत्काळ वेरूळ येथील प्राथमिक आरोग्य रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी श्रेयस वाघमारे यांनी सर्व जखमींच्या अंगावरील मधमाशांनी चावा घेतलेले काटे काढले व आईस पॅक लावून उपचार केले. तसेच याची माहिती मिळताच अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी जी. एम. कुंडलीवार यांनीही येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जखमी झालेल्या पर्यटकांची भेट घेऊन पाहणी केली. तसेच जखमी पर्यटकांना दोन तास निरीक्षणाखाली ठेवण्याचे सांगितले, त्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.

वेरूळ येथील जगप्रसिद्ध लेण्या पाहण्यासाठी जगभरातील पर्यटक येत असतात. मात्र येथे असलेल्या 34 लेण्यांपैकी बऱ्याच लेण्यात आग्या मोहळ बसलेले आहे. दरम्यान 10 वर्षांपूर्वी लेणी क्रमांक 29 व 16 मध्ये मधमाशांनी केलेल्या हल्ल्यात विदेशी पर्यटक गंभीर जखमी झाले होते. त्यापूर्वी 2007 मध्येही आग्यामोहळाने पर्यटकांवर हल्ला चढवल्याची घटना समोर आली होती. आता पुन्हा तिसऱ्यांदा अशीच घटना समोर आली आहे. त्यामुळे पुरातत्त्व विभागाने दक्षता घेण्याची गरज असून, याकडे त्यांचे अक्षम्य दुर्लक्ष असल्याचा आरोप केला जात आहे.