कृषि मंत्र्यांसमोर निदर्शने ः गुलाबराव वाघांसह पदाधिकार्‍यांविरोधात गुन्हा

 

तरुण भारत लाईव्ह न्युज धरणगाव ः अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीनंतर जिल्हा दौर्‍यावर पाहणीसाठी आलेल्या कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांना पाहून निदर्शने केल्या प्रकरणी उद्धव ठाकरे गटाचे जिल्हा सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ यांच्यासह 12 पदाधिकार्‍यांविरोधात जमावबंदीसह दौर्‍यात गदारोळ निर्माण केल्याप्रकरणी धरणगाव पोलिसात गुन्हा दाखत करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

दौर्‍यात गोंधळ घालत केली घोषणाबाजी

राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार हे बुधवार, 22 मार्च रोजी जळगाव जिल्ह्याच्या दौर्‍यावर असताना चोपडा, धरणगाव आणि एरंडोल तालुक्यातील शेतकर्‍यांच्या बांधावर जावून नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. धरणगाव तालुक्यातील दौर्‍यादरम्यान उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ यांच्या नेतृत्वात आंदोलन करून घोषणाबाजी करण्यात आली तसेच दौर्‍यात गदारोळ निर्माण केल्याच्या आरोपावरून नाईक मिलिंद अशोक सोनार यांच्या फिर्यादीवरून गुलाबराव रतन वाघ, युवा सेना जिल्हाध्यक्ष निलेश सुरेश चौधरी, भागवत भगवान चौधरी, अ‍ॅड.शरद माळी, राजेंद्र पुंडलिक ठाकरे, विजय माधवराव पाटील, विलास परशूराम वाघ, महेंद्र भास्कर चौधरी, भरत भगवान महाजन, गणेश मराठे, राहुल रघुनाथ महाजन, बापू चावदस महाजन यांच्याविरोधात धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जिभाऊ तुकाराम पाटील करीत आहे.