कोलकाता : कोलकाता येथील आरजी कर हॉस्पिटलमध्ये ट्रेनी डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणाने संपूर्ण देश या घटनेच्या निषेधार्थ पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या राजीनाम्याची मागणी करत मंगळवारी मोठ्या संख्येने विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. या आंदोलनाला ‘नबन्ना प्रोटेस्ट’ असं नाव देण्यात आलं होतं. दरम्यान, यावेळी पोलिसांनी आंदोलक विद्यार्थ्यांवर लाठीमार केला. तसंच, नबन्ना प्रोटेस्टचा आयोजक सयान लाहिडी यालाही अटक केली. मात्र, यानंतरही आज हे आंदोलन सुरू आहे.
दुसरीकडे, राज्य सचिवालयावर मोर्चा काढणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ भाजपने आज १२ तासांच्या बंदची हाक दिली आहे. या बंगाल बंद दरम्यान अनेक ठिकाणी भाजप आणि तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते एकमेकांशी भिडले असून भाटपारा येथे भाजपच्या नेत्यावर गोळीबार झाल्याचं सांगण्यात येत आहे. भाटपारा येथील भाजप नेते प्रियंगू पांडे यांच्या कारवर सहा राऊंड गोळीबार करण्यात आल्याचा आरोप भाजप नेते अर्जुन सिंह यांनी केला आहे.