Beware : सध्या सोशल मीडियावर अनेकांना ‘Hi, How Are You?’ असा मेसेज message येत आहे. तुम्हालाही असा मेसेज आला असेल तर, सावधान! तुमची एक चूक आणि तुम्ही सायबर गुन्हेगारीला Cyber Crime बळी पडाल.
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा
सायबर गुन्हेगार सामान्य नागरिकांना ऑनलाईन गंडा घालण्यासाठी विविध शक्कल लढवतात. वेगवेगळ्या पद्धती वापरून सायबर गुन्हेगार नागरिकांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करतात. सध्या असंच एक सायबर गुन्हेगारी संबंधित प्रकरण समोर आलं आहे. सध्या बहुतेकांना सोशल मीडिया प्लॅटफॉर्म व्हॉट्सॲपवर ‘Hi, How Are You? असे मेसेज येत आहेत. हे मेसेज सायबर गुन्हेगारीशी संबंधित असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. अशा अनोळखी मेसेजला रिप्लाय न करता त्याकडे दुर्लक्ष करण्याचा सल्ला सायबर तज्ज्ञांनी दिला आहे.
‘अशा’ मेसेजकडे दुर्लक्ष करा
व्हायरल मेसेजबद्दल सायबर तज्ज्ञांनी सांगितलं आहे की, सायबर गुन्हेगारांची ही नवी पद्धत असू शकते, त्यामुळे अशा मेसेजकडे दुर्लक्ष करा. मेसेजमध्ये आलेल्यां लिंकवर क्लिक करू नका किंवा काही डाऊनलोड करून नका, यामुळे तुमची माहिती क्षणार्धात हॅक केली जाऊ शकते आणि हॅकर याचा वापर चुकीच्या कामांसाठी करु शकतो. त्यामुळे कोणत्याही अनोळखी नंबरवरून असे मेसेज आल्यास त्याकडे दुर्लक्ष करा आणि संबंधित नंबर ब्लॉक करा.
अनेक सोशल मीडिया युजर्सना असे मेसेज आले असून त्यांनी याबाबत सोशल मीडियावर माहिती दिली आहे. एका युजरने सांगितलं म्हटलं आहे की, ‘हो, मलाही येत होते गेल्या काही दिवसांत. आधीचा अनुभव असल्यामुळे उत्तर न देता ब्लॉक करत गेले. आता थांबलेत. हातात स्मार्टफोन असेल तर कोणीही सुरक्षित असू शकत नाही हे कळलंय.’
दुसऱ्या एका सोशल मीडिया युजरने स्वत:चा अनुभव सांगत लिहिलं आहे की, ‘रोज 2,3 मेसेजेस येतायत. मी एका फेक अकाऊंटच्या मेसेंजरवर फोन नंबर दिला तेव्हापासून मला असे मेसेजेस यायचं प्रमाण वाढलंय. अकाउंट फेक आहे हे नंतर कळलं, त्या आधी नंबर दिला होता. अनोळखी नंबरवरून आलेल्या मेसेजेसमध्ये कसलीही लिंक असेल तर ती क्लिक किंवा डाऊनलोड न करणे, नंबर ब्लॉक करणे, ही काळजी घ्या.’
आणखी एका युजरने लिहिलं आहे की, ‘मला खूप आलेत. काहीच रिप्लाय नाही केला. Ignored. एक जण मात्र How are you च्या पुढे जाऊन I want to share something important with u असं विचारता, पण त्यालाही Ignore केलं. अशा खूप गोष्टी घडतायत. ज्या अर्थी ते आपण काहीतरी रिप्लाय करण्याची वाट पाहतायत आणि आपण रिप्लाय करावा, असेच मेसेज पाठवत आहेत. त्यावरून एवढंच कळलं की रिप्लाय करेपर्यंत आपण सेफ आहोत.’
सायबर तज्ज्ञ काय सांगतात?
सायबर तज्ज्ञ (Cyber Expert) ॲड. प्रशांत माळी (Adv. Prashant Mali) यांनी याबाबत माहिती देताना सांगितलं आहे की, तुमच्यासोबत संवाद साधण्यासाठी हॅकर्स अशा मार्गांचा वापर करतात. याला ”Conversation Hook” हूक असं म्हणतात. अनोळखी नंबरवरून एखादी व्यक्ती तुम्हाला मेसेज करते, पण त्यामागे एक सायबर गुन्हेगार बसलेला असतो, जो तुम्हाला गप्पांमध्ये अडकवून तुमचा डेटा लीक करून तुम्हाला एखाद्या फसवणुकीचा शिकार बनवण्याच्या प्रयत्नात असतो. अशा अनोळखी मेसेजकडे दुर्लक्ष करून असेल नंबर ब्लॉक करण्याचा सल्ला सायबर तज्ज्ञ ॲड. प्रशांत माळी यांनी दिला आहे.
हॅकर्सला बळी न पडण्यासाठी कोणती काळजी घ्याल?
अनोळखी नंबरला रिप्लाय देऊ नका.
अनोळखी नंबरवरून आलेल्या अशा मेसेजकडे दुर्लक्ष करा.
मेसेजमध्ये लिंक, फोटो असल्यास त्यावर क्लिक करु नका. यामुळे तुमचा डेटा हॅक होण्याची भीती आहे.
असे व्हायरल मेसेज येत असल्यास असे नंबर ब्लॉक करा.
तुमच्या मोबाईलच्या प्रायव्हसी सेटिंग्स बदलून डेटा अधिक सुरक्षित करा.