नवी दिल्ली : मारुती सुझुकी कंपनीने ग्राहकांना विकलेल्या १७ हजारांहून अधिक गाड्या परत मागवल्या आहेत. एका चुकीमुळे कंपनीला हा निर्णय घ्यावा लागला आहे. गाड्यातील सुरक्षामानकांचा आढावा घेतल्यानंतर कंपनीला ही चूक लक्षात आली आहे. त्यानंतर कंपनीने मोठ्या संख्येने गाड्या परत मागवल्या आहेत. मारुती सुझुकीने बुधवारी सांगितलं की, ऑल्टो के १०, ब्रेझा आणि बलेनो मॉडेलच्या एकूण १७,३६२ गाड्यांमध्ये ही समस्या दिसली आहे. त्यानंतर कंपनीने एअरबॅग तपासणी आणि बदलण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे. परत मागवलेल्या गाड्यांमध्ये ऑल्टो के १०, एस-प्रेसो, ईको, ब्रेझा, बलेनो आणि ग्रँड विटारा या गाड्यांचा समावेश आहे. या गाड्यांची निर्मिती ८ डिसेंबर २०२२ ते १२ जानेवारी २०२३ दरम्यान केली होती.
कंपनीने सांगितलं की, गाड्यांची योग्य ती तपासणी केली जाईल. एखादी समस्या दिसल्यास कोणतेही शुल्क न आकारात एअरबॅग बदलली जाईल. आम्हाला शंका आहे की, काहीतरी चूक झाली आहे. त्यामुळे दुर्घटना झाल्यास एअरबॅग आणि सीट बेल्ट प्रेटेंसर व्यवस्थितरित्या काम करेल की नाही याबाबत शंका आहे. वाहनधारकांना कंपनीने सूचना दिली असून जवळच्या अधिकृत वर्कशॉपमध्ये संपर्क साधण्यास सांगितलं आहे. तत्पूर्वी या काळात घेतलेली वाहनं काळजीपूर्वक चालवण्याची सूचना देखील केली आहे.