ब्रह्मांडीं तेंचि पिंडीं असे।

समर्थ नेतृत्व

– माधव श्रीकांत किल्लेदार

मनुष्यप्राणी हा गुण आणि कौशल्य याने नटलेला आहे. सर्व प्राणिमात्रात मनुष्याला जे हवे आहे ते स्वतःच्या अंगभूत गुणांनी प्राप्त करता येते. काही वेळेस अनेक प्रकारचे गुण आत्मसात करून स्वतःचे ध्येय मनुष्यप्राणी ठरवू शकतो. आत्मसात केलेल्या गुणांनी ध्येय प्राप्तीही करता येते. गुण आत्मसात करणे हे कौशल्य केवळ आणि केवळ मनुष्यालाच अवगत आहे. गुण आत्मसात करणे हे जरी कौशल्य असले, तरी आत्मसात केलेले गुण टिकवून ठेवणे, चांगल्या गुणांची वृद्धी करणे हाही एक महत्त्वाचा गुण असतो. मानव हा अनेक जन्मांचे संस्कार घेऊनच पृथ्वीतलावर जगत असतो. एका जन्मात मानव प्राणी सगळेच प्राप्त करू शकत नाही. कारण जीवन हे खूप व्यापक आहे.

जीवनाच्या वेगवेगळ्या शाखा आहेत. पिंडी ते ब्रह्मांडी हे शाश्वत सत्य असले, तरीही प्रत्येक मनुष्य जगातील प्रत्येक गोष्ट प्राप्त करू शकत नाही. कारण मनुष्यप्राण्यालासुद्धा खूप मर्यादा आहेत. जर या मर्यादा नसत्या तर पृथ्वीवरील मनुष्य उत्तमरीत्या जीवन जगू शकला नसता. जे सकारात्मक दृष्टीने जीवन जगताना किमान तसा जरी विचार करतात त्यांच्याकरिता मानवी जीवनातील मर्यादा याच त्यांना अमर्याद करतात. पण, जे नकारात्मक पद्धतीने जीवन जगतात ते मात्र अमर्याद होऊ शकत नाही.

मनुष्य जीवनाची कुठेतरी ही शोकांतिका असावी की जास्तीत जास्त प्रमाणात मनुष्यप्राणी हे अमर्याद होऊ शकत नाहीत. भारतीय जीवन पद्धतीत किंवा हिंदू जीवन पद्धतीत जे चार पुरुषार्थ सांगितले आहेत ते मनुष्याने यथार्थ जीवन जगून दाखवावे याकरिताच आहेत. हे चारही पुरुषार्थ न्याय, नीतिमत्ता या मर्यादांच्या आधारे मनुष्याला मार्गदर्शन करीत असतात. जे या मर्यादांचे पालन करतात तेच श्रेष्ठ पुरुष म्हणून मान्यता पावतात. ज्यांना हे श्रेष्ठत्व मिळवायचे असेल त्यांनी श्री समर्थांनी सांगितल्यानुसार ‘अवगुण सांडिता जाती उत्तम गुण अंगीकारिता येता’ हे तत्त्व आचरणात आणावे. अवगुणांवर विजय मिळविणे म्हणजेच अमर्यादित होणे आणि उत्तम गुणांचा अवलंब करणे म्हणजेच श्रेष्ठ पुरुष होण्याच्या दिशेने प्रवास करणे होय!

प्राचीन काळी एक गुरुकुल होते. त्या गुरुकुलात मोजकेच विद्यार्थी शिकत असत. त्यांना सर्व विद्या आणि कला शिकवल्या जात. जीवनात यशस्वी होण्यासाठी लागणारे व्यवहारज्ञान त्यांना शिकवले जाई. त्या गुरुकुलाचे प्रमुख आचार्य हे थोर सत्पुरुष होते. त्यांनी अनेक शिष्य घडवलेले होते. विद्यार्थ्यांना सर्व विद्या आणि कलांमध्ये पारंगत केल्यावर ते त्यांची परीक्षा घेत असत. विद्यार्थ्यांकरिता त्यांचे कुलगुरू हे आदर्श होते. त्यामुळे प्रत्येकाला त्यांच्याप्रमाणे होण्याची इच्छा होती. ते त्यांच्या प्रत्येक कृतीचे अनुकरण करत असत तसेच गुरूंनी मिळविलेले ज्ञान आपल्यालाही प्राप्त व्हावे म्हणून ते ज्ञानसाधना करीत असत. सर्व विद्यार्थी सर्व विद्या आणि कलांमध्ये पारंगत झाल्यावर त्यांच्या अंतिम परीक्षेची वेळ आली. विद्यार्थ्यांमध्येही परीक्षेविषयीची उत्सुकता होती. कारण त्या प्रत्येकाला त्यांच्या गुरूसारखे व्हायचे होते. परीक्षेचा दिवस ठरला होता. गुरूंनी सर्व विद्यार्थ्यांना तयार राहायला सांगितले होते. गुरूंनी त्या सर्व विद्यार्थ्यांना आश्रमाबाहेर असलेल्या नदी किनार्‍यावर एकत्र जमायला सांगितले. त्याप्रमाणे सगळे विद्यार्थी तेथे जमले. गुरूंनी त्यांना त्यांच्या मागे चालण्यास सांगितले. सर्व शिष्य गुरूंच्या मागे चालू लागले. बराच वेळ चालल्यावर गुरू आणि शिष्य एका गावात आले. गुरू गावातील प्रत्येक गोष्टीची माहिती देत होते. शिष्य त्यांच्याकडून सगळी माहिती समजून घेत होते. दुपार झाली होती. शिष्यांना प्रचंड भूक लागली होती, ही गोष्ट गुरूंना समजली. गुरूंनी त्यांना बाहेरील अन्न खाण्याची परवानगी दिली.गुरूंनी जर बाहेरील अन्न ग्रहण केले तरच आम्ही ते अन्न ग्रहण करू, असे शिष्यांनी गुरूंना सांगितले. गुरूंनी शिष्यांची विनंती मान्य केली. त्यात अट एकच होती की, गुरू जे करतील ते शिष्यांनी करावे. शिष्यांनी त्यास लगेच होकार दिला. त्याप्रमाणे गुरू जे काही करीत होते ते ते शिष्य करीत होते. जे जे गुरूंना जमत होते ते ते शिष्यांनाही जमत होते. त्यामुळे त्या शिष्यांना आपणच गुरू झालो आहोत, असा समज किंवा भ्रम व्हायला लागला. गुरूंनी शिष्यांची मानसिकता ओळखली होती. शिष्यांचा भ्रम नष्ट करायला हवा असे त्यांना वाटले. गुरूंनी एक योजना आखली. त्यांनी शिष्यांना एका दुकानात नेले. गुरूंनी दुकानातील कोळसा घेतला आणि खाण्यास सुरुवात केली. शिष्यांनीही त्यांचे अनुकरण केले. शिष्यांना वाटले की, जर आपले गुरू कोळसा खाऊन पचवू शकतात तर आपणही हे करू शकतो. थोड्या वेळाने गुरूंनी जे चार कोळशाचे तुकडे खाल्ले होते ते जसेच्या तसे तोंडातून बाहेर काढले. सर्व शिष्यांनी आणि गावकर्‍यांनी हा प्रकार पाहिला. गुरूंनी शिष्यांकडे पाहिले आणि त्यांचे अनुकरण करण्यास सांगितले. त्या सर्व शिष्यांना गुरूंनी केलेला हा चमत्कार करता आला नाही. त्यांचा भ्रमनिरास झाला. त्यांना त्यांची चूक समजली. त्यांनी गुरूंची क्षमा मागितली. गुरूंनी त्यांना मोठ्या मनाने क्षमा केली आणि आशीर्वाद दिला. समर्थ नेतृत्वाचे अनेक अनुयायी असतात. त्या प्रत्येक अनुयायांना आपणही समर्थ नेतृत्व करू शकतो, असे स्वाभाविकपणेच वाटते. परंतु, प्रत्यक्षात तसे घडत नाही. सामर्थ्यशाली नेतृत्वाने जे सांगितले आहे ते करावे. परंतु, त्यासारखे नेतृत्व करण्याचा प्रयत्न करू नये.
श्रीसमर्थ याविषयी श्रीमद् दासबोध ग्रंथात असे म्हणतात की,

॥ श्रीराम ॥
पृथ्वीमध्यें लोक सकळ। येक संपन्न येक दुर्बळ।
येक निर्मळ येक वोंगळ। काय निमित्य।
कित्येक राजे नांदती। कित्येक दारिद्र भोगीति।
कितीयेकांची उत्तम स्थिती। कित्येक अधमोद्धम।
ऐसे काय निमित्य जालें। हें मज पाहिजे निरोपिलें।
याचे उत्तर ऐकिलें। पाहिजें श्रोती
हे गुणापासी गती। सगुण भाग्यश्री भोगिती
अवगुणांस दरिद्रप्राप्ती। येदर्थी संदेह नाहीं
जो जो जेथें उपजला। तो ते वेवसाईं उमजला
तयास लोक म्हणती भला। कार्यकर्ता॥

याचा अर्थ असा आहे की, पृथीतलावर अनेक लोक राहतात. त्यातील काही संपन्न तर काही दुबळे आहेत. काही निर्मळ आहेत तर काही ओंगळ आहेत. याचे कारण काय? काही जण राजवैभव भोगतात, काही दारिद्र्य भोगतात. काहींची स्थिती उत्तम असते तर काही जण वाईट अवस्थेत जीवन जगतात. याचे कारण काय ते सांगतो. श्रोत्यांनी ते ऐकावे. गुणांच्या प्रभावामुळे या सर्व गोष्टी घडतात. जे सद्गुणी असतात त्यांचे भाग्य उदयाला येते आणि जे अवगुणी असतात त्यांना दारिद्र्यात खितपत पडावे लागते, यात अजिबात शंका नाही. ज्याने जेथे जन्म घेतला त्याने तेथील व्यवसाय वाढवला तर लोक त्यास उत्तम कार्यकर्ता म्हणतात.

पुढे जाणपण निरूपण समासात श्रीसमर्थ रामदास स्वामी असे म्हणतात की,

जाणते लोक ते शाहाणे। नेणते वेडे दैन्यवाणे।
विज्ञान तेहि जाणपणें। कळो आलें॥

याचा अर्थ असा आहे की, जाणते लोक असतात ते शहाणे असतात. नेणते वेडे दैन्यवाणे असतात. विज्ञान म्हणजेच अनुभव म्हणजे काय, हे पण जाणपणामुळेच कळू लागते.

जेथें जाणपण खुंटलें। तेथें बोलणें हि तुटलें।
हेतुरहित जालें। समाधान॥

याचा अर्थ असा आहे की, जेथे जाणीवही खुंटते तेथे बोलणेही तुटते. स्वरूपानुभव आला की जाणीवही राहात नाही आणि शब्दही तेथपर्यंत पोहोचू शकत नाही. त्यामुळे हेतूरहित अनिर्वचनीय असे समाधान मिळते.

श्रोतें म्हणती हें प्रमाण। जालें परम समाधान।
परी पिंडब्रह्मांड ऐक्यलक्षण। मज निरोपावें॥

याचा अर्थ असा आहे की, श्रोते म्हणतात की आपले हे सांगणे प्रमाण आहे. त्यामुळे परम समाधान प्राप्त झाले आहे. परंतु, मला आता पिंड-ब्रह्मांड ऐक्य लक्षण समजावून सांगावे.

ब्रह्मांडीं तेंचि पिंडीं असे। बहुत बोलती ऐसें।
परंतु याचा प्रत्यय विलसे। ऐसें केलें पाहिजे॥

याचा अर्थ असा आहे की, जे ब्रह्मांडात असते, तेच पिंडात असते असे अनेक लोक सांगतात, पण त्याचा प्रत्यय यावा असे आपण केले पाहिजे.
प्रभू श्रीराम आणि भगवान श्रीकृष्ण हे भारतीयांचे, हिंदूंचे समर्थ नेतृत्व आहे. Positive vision प्रभू श्रीरामाने त्यांच्या आदर्श जीवन पद्धतीतून जे सांगितले आहे ते करावे. प्रभू श्रीरामाने जो त्रास सहन केला आहे तशा प्रकारचा त्रास आपण सहन करू शकत नाही, हे लक्षात ठेवावे. तसेच, भगवान श्रीकृष्णांप्रमाणे जीवन जगण्याचा प्रयत्न करू नये. परंतु, भगवान श्रीकृष्णांनी महाभारतात ज्या लीला केल्या आणि धर्माचे राज्य प्रस्थापित केले त्यातून आपण धर्माचरण कसे करावे हे शिकावे. त्यातूनच सामर्थ्यशाली हिंदुराष्ट्राची निर्मिती होईल.

॥ जय जय रघुवीर समर्थ ॥

9921684224