जेवणासाठी कार उभी केली, चोरट्यांनी तेच हेरलं अन् चक्क.., जळगावमधील घटना

जळगाव : जेवणासाठी आलेल्या नागरिकांच्या कारची काच फोडून बॅग चोरी केल्याची घटना आज दुपारी १ वाजेच्या सुमारास चित्रा चौकात घडली. याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.  दरम्यान, भरदिवसा पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर ही घटना घडल्याने पोलीस कुठे होते? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

शिरपूर येथील जितेंद्र शालीग्राम भदाणे हे एका मित्रासह जळगावमार्गे चारचाकी क्रमांक एमएच.१८.बीसी.०२५७ ने जामनेर जात होते. दुपारी १२.४० च्या सुमारास चित्रा चौकात असलेल्या एका फर्टीलायझर दुकानाच्या बाहेर त्यांनी कार उभी केली आणि जेवणासाठी जवळच्या हॉटेलमध्ये गेले. दोघे जेवण करुन १.१५ वाजता परत आले असता त्यांना मागील दरवाज्याची काच फुटलेली दिसून आली.

कारमध्ये डोकावून पहिले असता मागील सीटवर ठेवलेली बॅग त्यांना दिसून आली नाही. दोघांनी तात्काळ शहर पोलिसात धाव घेत पोलिसांना माहिती दिली. शहर पोलिसांनी घटनास्थळी भेट देउन सर्व जाणून घेतले. बॅगमध्ये १० हजारांची रोकड आणि महत्वाचे दस्तऐवज होते. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी पुढील तपास सुरु केला आहे.