मशिदीवरील भोंगा चालतो मग दिंडीच्या वाद्याला विरोध का?

तरुण भारत लाईव्ह न्यूज । चंद्रशेखर जोशी । पाळधी बुद्रुक आणि पाळधी खुर्द ही धरणागाव तालुक्यातील अगदी शेजारी असलेली दोन छोटी गावे. दोन्ही गावांची मिळून जेमतेम २२ ते २५ हजाराची लोकसंख्या. गावे छोटी मात्र राज्यात प्रसिद्ध. याचे कारण खान्देशची मुलुख मैदान तोफ म्हणून प्रसिद्ध असलेले पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचे हे गाव. आपल्या वक्तृत्व शैलीने गुलाबराव भल्या भल्या झोपलेल्यांना खडबडून जागे करतात, अशी त्यांची ख्याती आहे. (अगदी उद्धव ठाकरेंच्या सभेत त्यांचे भाषण भारी ठरते म्हणून बोलू दिली जात नाही असे म्हटले जात असे) त्यांचे हे गाव… त्यांची सध्याची आणखी एक ओळख म्हणजे ‘पाणीवाला बाबा’ म्हणूनही त्यांचा लोैकीक सर्वत्र पोहोचला आहे.

पाणीवाला बाबा ही ओळख अशासाठी की त्यांनी अनेक गावांना नव्याने पाणी योजना देऊन गावाची तहान भागविली. कामातील त्यांची धडाडी व प्रत्येक गावापर्यंत पाणी पोहोचले पाहीजे ही भावना लक्षात घेऊन त्यांना ही उपाधी सार्थ ठरते. मात्र या आठवड्याच्या प्रारंभी या गावातील शांततेला काही मुस्लिमांनी गालबोट लावले. गावातून सप्तश्रृंगी गडाकडे जाणार्‍या दिंडीतील भाविकांवर जीवघेणी दगडफेक झाली. जीव वाचविण्यासाठी दिंडीतील भाविक सैरावैरा धावत होते. तमाम हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या दिंडीतील वारकर्‍यांवर दगडफेक करणे हा प्रकार अतिशय गंभीर… याचे पडसाद गावात उमटले व संतापलेल्या हिंदूनीही दगडफेक करणार्‍यांना उत्तर दिले. पाळधीसारख्या शांत गावात दंगलीचा कलंक अशा पद्धतीने लावला गेला. गावागावांमध्ये अशा पद्धतीने असंतोष पसरविणार्‍यांवर कडक कारवाई होणे गरजेचे आहे. असाच प्रकार छत्रपती संभाजीनगर येथे घडला.

औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर असे नामांतर झाल्यानंतर काही औरंगजेबांची अवलाद असलेल्यांचे माथे फिरलेलेच होते. त्यांनी तेथे दगडफेक केली. संभाजीनगरात प्रचंड जाळपोळ, दगडफेक करत चेहेरा बांधून आलेल्यांनी विध्वंस घडवून आणला. तेथेही भगवान श्रीरामांच्या मंदिराजवळ हा प्रकार घडला. त्यामुळे हिंदूंना भडकविण्याचा प्रकार ठिकठिकाणी सुरू झाला असल्याचेच लक्षात येते. जळगावात असे प्रकार घडले मात्र चोख उत्तर मिळाल्यानंतर आता श्रीरामाच्या रथाचे काही वर्षांपासून स्वागत होऊ लागले आहे, ही भावना स्वागतार्ह पण मशिदीच्या जवळ घोळका करून उभे रहाणे, वाद्य बंद करा असे वारकर्‍यांना सांगितल्यावर त्यांनी ते बंद केले, पण बंद करताना चुकून वाद्याचा आवाज वाढला बस एवढे कारण मिळताच दिंडीवर दगडफेक सुरू करणे हा कुठला न्याय. या दिंडीत पाळधीतील नागरिक नव्हते. आलेल्या दिंडीचे स्वागत करण्याची अनेक गावात परंपरा आहे. यात बर्‍याच ठिकाणी मुस्लिम व्यक्तीही असतात मग पाळधीतच अशी विध्वंसक वृत्ती कशी वाढली. यांना प्रोत्साहन कुणाचे, कुणाच्या जोरावर ही मंडळी असे कृत्य करते, याचा शोध घेतला जाणे गरजेचे आहे. आज चार दिवसांपासून या छोट्याशा गावात संचारबंदी सुरू आहे. याचा फटका गोरगरीब कुटुंबांना बसत आहे. अनेकांच्या घरात चुल पेटणे कठीण झाले आहे. याचा विचार या दंगलखोरांनी करणे गरजेचे आहे. सर्वधर्म समभावाचा नारा हिंदू देतात तशी कृतीही करताना दिसतात. मात्र तिच भावना समोरून असणे गरजेचे आहे. मशिदींवरील भोंग्याचा त्रास अनेक जण वर्षानुवर्षे सहन करत आहेत. न्यायालयाने याबाबत निर्देश देऊनही उपयोग नाही. अनेक ठिकाणी अचानक अतिक्रमण होऊन दर्गा उभा रहातो.

धरणगावातील गायरान जमिनीवरील अतिक्रमणाच्या विषयावर प्रचंड विरोध झाला, आंदोलने झाली. अखेर याप्रश्नीही न्यायालयाने निर्देश दिल्यानंतर हे अतिक्रमण काढले गेले, तेदेखील घाबरत घाबरत, प्रचंड पोलीस ताफा एकत्र करून ही कारवाई केली गेली. मग एवढी दहशत का सहन करायची? आणि तीदेखील पोलीस प्रशासनाने हे एक आश्चर्यच आहे. जे चुकीचे आहे त्याला विरोध झालाच पाहीजे दहशत कशासाठी सहन करायची? पाळधीतील दिंडीवरील दगडफेकीच्या प्रकारानंतर तिसर्‍या दिवशी म्हणजे 30 मार्च रोजी तिसरा गुन्हा दाखल झाला. एक रफीक रज्जाक देशपांडे जागा झाला आणि म्हणाला 500 लोक आले त्यांनी प्रभू रामचंद्रांचा जयजयकार करत आपणास मारले व टिपू सुलतानचा फोटो फाडला. आता 500 लोकांनी एखाद्यास मारल्यावर त्याची काय अवस्था होईल? याचा विचार न करता पोलीस प्रशासनानेही अगदी तत्परता दाखवत सुमारे 500 लोकांवर गुन्हा दाखल केला, आहे की नाही गंमत. त्यामुळेच नेमके असे प्रकार करणार्‍यांचा शोध घेणे गरजेचे आहे. शांतता प्रस्थापित करायची तर प्रशासनाला काही बाबतीत कठोर व्हावे लागेल, चुकीच्या गोष्टींविरोधात दंडुका हातात घ्यावा लागेल.