पुणे : अजित पवार यांना बंडात साथ देणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. भुजबळ यांच्या कार्यालयात फोन करून ही धमकी देण्यात आली आहे. “मला छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची सुपारी मिळाली आहे. मी सांगून काम करतो, म्हणून फोन केला” अशी धमकी प्रशांत पाटील याने छगन भुजबळ यांच्या कार्यालयातील व्यक्तीला फोन करून दिली आहे.
धमकी देणाऱ्या व्यक्तीने आपले नाव प्रशांत पाटील असल्याचे सांगितले. त्यानंतर याच फोनच्या आधारे पुणे पोलिसांनी प्रशांत पाटीलला महाडमधून ताब्यात घेतले आहे. भुजबळ यांना प्रशांत पाटील याने दारूच्या नशेत ही धमकी दिली असल्याचं प्राथमिक तपासात समोर आले आहे. पाटील हा मूळचा कोल्हापूर येथील आहे. पाटील याची पार्श्वभूमी काय आहे? तो कोणत्या पक्षाशी संबंधित आहे का? याबाबत पुणे पोलीस अधिक तपास करत आहे.
जेव्हापासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड झाले आहे. तेव्हापासून छगन भुजबळ हे शरद पवार यांच्यावर निशाणा साधत आहेत. त्याचबरोबर शरद पवारांनी देखील छगन भुजबळ यांच्याच येवला मतदारसंघात सभा घेऊन मोठे शक्तीप्रदर्शन केलं होतं. त्यामुळे हा संघर्ष मोठा होणार असं सर्वत्र राजकीय चित्र असतानाच छगन भुजबळ यांना धमकी आल्याने त्याचे अर्थ वेगवेगळे लावले जात होते.