भुसावळातील गुन्हेगारीला पोलिसांचा चाप : तीन वर्षात गुन्हे निम्म्यावर

Police crack down on crime in Bhusawal : Crime has halved in three years भुसावळ (गणेश वाघ) : गुन्हेगारी कारवायांमुळे राज्यात बदनाम झालेल्या भुसावळातील गुन्हेगारी तीन वर्षात निम्म्यावर आली आहे. वाचून निश्चितच सर्वांना धक्का बसेल मात्र पोलिस प्रशासनाने अलिकडील काळात घेतलेल्या कठोर भूमिकेमुळे तसेच केलेल्या उपायांमुळे गुन्हेगारीत तीन वर्षात घट झाली आहे. भुसावळ म्हटले की ‘गुन्हेगारांचे जंक्शन’ अशीच प्रतिमा अलीकडे निर्माण झाली होती. त्याला कारणही तसेच होते. धावती बस असो की न्यायालयाचे आवार वा खुले मैदान गुन्हेगारांनी ‘बदले की आग’ मध्ये गोळ्या झाडून प्रतिस्पर्ध्याचा खून केला नाही तर नवलच ! सातत्याने घडणार्‍या या घटनांमुळे भुसावळकरांसाठी खुनाचे गुन्हेदेखील नवीन राहिलेले नव्हते मात्र अलिकडे पोलिसांनी राजकीय दबाव झुगारून केलेल्या कठोर उपाययोजनांमुळे शहरातील गुन्हेगारी बर्‍यापैकी थोपवण्यात यश आले आहे.

जंक्शनमधील गुन्हेगारी आली ‘ऐरणीवर’

शहरात गेल्या काही वर्षात अनेक स्वयंघोषित दादा निर्माण झाले याला कारणीभूत पोलिस प्रशासनाला लाभलेला छुपा आशीर्वाद व लाभलेला राजाश्रय हेच प्रमुख कारण होते व त्यातून वर्चस्ववाद निर्माण झाल्याने एकमेकाला शह देण्यासाठी म्हणा अथवा स्वतःची दहशत निर्माण होण्यासाठी म्हणा अनेक अप्रिय घटना घडल्यात व त्यात प्राणहानीदेखील झाली तर दोन कुटुंबातील आपसातील वैमनस्यातून शहरात गुन्हेगारी अधिकच फोफावली तर एकाच कुटुंबातील पाच सदस्यांच्या हत्याकांडाने महाराष्ट्रात खळबळ उडून शहरातील गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला.

नव्या दमाच्या अधिकार्‍याने बदलले शहराचे चित्र

तत्कालीन पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे व विद्यमान पोलिस अधीक्षक एम.राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळात रूजू झालेले पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी सुमारे अडीच वर्षांपूर्वी शहराची धूरा सांभाळली ती गुन्हेगारी संपवण्याच्या उद्देशातूनच ! पदभार घेतानाच त्यांनी वर्षभरात शहर गुन्हेगारीमुक्त करण्याचा संकल्प केला व तो पूर्ण करण्यासाठी साम, दाम, दंड, भेद नितीचा अवलंब करीत बर्‍यापैकी गुन्हेगारीवर नियंत्रणही मिळवले. अर्थात बाजारपेठचे सिंघम अधिकारी राहुल गायकवाड असो की शहरचे गजानन पडघण यांचीदेखील साथ त्यांना तितकीच मोलाची ठरली. अलिकडील काळात संघटीत टोळ्यांविरोधात हद्दपारीच्या कारवाया वाढल्या तर गुन्हेगारांची कुंडली तयार करून त्यांच्याविरोधात हद्दपारीसह स्थानबद्धतेची कारवाईदेखील धडाधड होवू लागली तर स्वयंघोषित दादांच्या चौका-चौकातून निघालेल्या धिंडीमुळे व पोलिसांनी दिलेल्या चाबकाच्या फटकार्‍यांमुळे ‘स्वयंघोषित दादा’ लाईनीतून सरळ झाल्याचे या शहराने पाहिले तर जनतेच्या मनातही पोलिस दलाविषयी आदर आणखीनच वाढला. पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, सन 2020 मध्ये भुसावळ विभागात आठ खून झाले तर 2021 मध्ये सहा व हाच आकडा 2022 मध्ये तीनवर अर्थात निम्म्याहून कमी झाला.

खुनाच्या प्रयत्नासह जबरी चैन स्नॅचिंगमध्येही घट


तासाभराच्या अंतरावर असलेल्या मध्यप्रदेशात अवघ्या 20 ते 25 हजारात कट्टे सहज उपलब्ध होत असल्याने स्वयंघोषित भाईंसाठी कट्टे बाळगणे फॅशन बनले व त्यातून वर्चस्ववादात अनेकदा एकमेकांवर प्राणघातक हल्लेदेखील झाले मात्र पोलिसांनी या भाईंना कायद्याचा पाठ पढवल्याने अशा प्रकारचे गुन्हे आता निम्म्यावर आले आहेत. आकडेवारीनुसार 2020 मध्ये 18, 2021 मध्ये आठ तर 2022 मध्ये सात गुन्हे अशा पद्धत्तीने घडले तर शॉर्टकट श्रीमंत होण्याच्या नादात वाढलेल्या धूम स्टाईल मंगळसूत्र-चैन चोर्‍यांवर पोलिस प्रशासनाने अंकुश लावला. 2020 मध्ये 25 असलेला हा आकडा 2021 मध्ये 21 तर 2022 मध्ये 10 वर आला. वारंवार चोर्‍या करणार्‍या आरोपींचा जामीन रद्द करण्यासाठी न्यायालयाला विनंती करण्यात आली तसेच सातत्याने ऑल आऊटसह कोम्बिंग राबवून गुन्हेगारांच्या घराची झडती होवू लागल्याने गुन्हेगार धास्तावत त्यांनी अन्यत्र बस्तान मांडल्याने गुन्ह्यांमध्ये मोठी घट झाली. गावठी कट्ट्यातून पाच गोळीबाराच्या घटना 2020 मध्ये घडल्या तर नशिराबादच्या उड्डाणपुलाखाली 2021 मध्ये भुसावळातील तरुणाची हत्या झाल्यानंतर 2022 मध्ये अग्निशस्त्राचा वापर रोखण्यात यंत्रणेला यश आले व या वर्षात एकही गुन्हा घडला नाही.

चोर्‍या-घरफोड्यांना मात्र आळा नाही
शहरातील खुनासह शरीराविरोधात होणार्‍या ईजांच्या गुन्ह्यात घट भलेही झाली असलेतरी चोर्‍या-घरफोड्या रोखण्यात यंत्रणेला यश मिळालेले नाही नाही मात्र त्यात अलिकडील काळात काहीशी घट झालेली पहायला मिळाली. पोलिसांकडील आकडेवारीनुसार, 2020 मध्ये 55 तर 2021 मध्ये 37 व 2022 मध्ये 37 चोर्‍या-घरफोड्या झाल्या. यातील काहींची उकल झाली तर काही गुन्हे तपासावर आहेत. शहरातील विविध नागरी भागात आरएफआयडी प्रणाली कार्यरत करण्यात आल्याने पोलिसांची नियमित गस्त होत असल्याने घरफोड्या नियंत्रणात आल्या आहेत. दरम्यान, पोलिसांच्या आकडेवारीनुसार, गुन्हेगारीत भलेही घट झाली असलीतरी गुन्हेगारीचा अद्यापही समूळ नायनाट झालेला नाही शिवाय महिलांसह मुलींच्या छेडखानीसह, वाहतूक कोंडी या समस्यांनी शहरवासी त्रस्त असल्याने आगामी काळात या समस्यांना आव्हान मांडून ते स्वीकारावे व समस्या सोडवाव्यात, अशी माफक अपेक्षाही शहरवासी व्यक्त करीत आहेत.

गुन्हेगारीवर निश्चितच अंकुश : सोमनाथ वाघचौरे
भुसावळचा पदभार घेतल्यानंतर गुन्हेगारी थोपवण्याचे आश्वासन आपण दिले व त्यानुषंगाने प्रत्यक्षात कृतीदेखील केली. सुरूवातीला 45 हद्दपारीचे प्रस्ताव तयार करण्यात आले तर 2022 मध्ये 22 व 2023 मध्ये 13 प्रस्ताव पाठवल्यानंतर अनेक गुन्हेगारी टोळ्या शहराबाहेर राहिल्या तसेच गुन्हेगारांवर हद्दपारीमुळे अंकुश लागला, असे पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे म्हणाले. ते म्हणाले की, शहरात नियमित गुन्हेगारांची तपासणी केली जाते शिवाय ऑल आऊटच्या माध्यमातून गुन्हेगार नियमित तपासले जातात शिवाय गुन्हा दाखल करताना दिरंगाई न करता तातडीने अ‍ॅक्शन घेतली जाते व आरोपींवर कारवाई होत असल्याने गुन्हेगारीला मोठ्या प्रमाणावर आळा बसला आहे. गुन्हेगारांच्या जामीन रद्दच्या प्रस्तावामुळे अन्य गुन्हेगारांना धक्का बसला शिवाय नॉन बेलेबल वॉरंटची बजावणी प्रॉपर करण्यात आल्याने त्याचाही परीणाम दिसून आला. गुन्ह्यांचा तपास करताना स्वतः नियंत्रण ठेवल्याने खोट्या गुन्ह्यांना आळा बसून किचकट गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिस यंत्रणेला यश आले, असे पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे ‘दैनिक तरुण भारत’शी बोलताना म्हणाले.