भुसावळात कृउबाची रणधुमाळी : प्रतिष्ठा आजी-माजी आमदारांची

भुसावळ : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत चांगलाच आखाडा तापला आहे. टोकाचे मतभेद असलेले आमदार एकनाथराव खडसे व माजी आमदार संतोष चौधरी यांनी प्रथमच एकत्र येत दिलजमाई केल्यानंतर भाजपा आमदार संजय सावकारे यांना धक्कातंत्र देण्याची रणनिती अवलंबली आहे तर आमदार संजय सावकारे यांनीदेखील दोघा नेत्यांना धोबीपछाड देण्यासाठी आपले कसब पणाला लावले आहे. निवडणुकीमुळे मतदार असलेले उमेदवारांना लक्ष्मी दर्शन झाल्याची चर्चा असून पाच हजारापर्यंत फुली गेल्याची चर्चा ऐकण्यास मिळाली तर मतांचे विभाजन टाळण्यासाठी यापूर्वीच मतदारांना सहलीला रवाना करण्यात आले व शुक्रवारी सकाळीच मतदार वाहनातून मतदानस्थळी प्रकट झाले.

मतदारांना घडले ‘लक्ष्मी’दर्शन
आमदार संजय सावकारे यांनी कृउबा निवडणुकीसाठी ताकद पणाला लावत बाजार समिती आपल्याकडे ओढण्यासाठी आपले कसब पणाला लावले आहे. जामनेरातून मंत्री गिरीश महाजन यांनी आमदारांना भक्कम पाठबळ दिल्याने गतवेळच्या निवडणुकीतील चुका टाळून अत्यंत सावध पवित्रा आमदारांनी घेतला आहे तर दुसरीकडे आमदार खडसे व माजी आमदार चौधरी यांनीदेखील कृउबावर वर्चस्व टिकवण्यासाठी फिल्डींग लावली आहे. ही निवडणूक नेत्यांसाठी विधानसभेसाठी लिटमस टेस्ट ठरणार असल्याने राजकीय समीक्षकांचेही या निवडणुकीकडे लक्ष लागले आहे. ग्राशहण भागातील सर्वाधिक मतदार असल्याने त्यांना मोठ्या प्रमाणावर लक्ष्मी दर्शन घडल्याची चर्चा आहे तर फुलीचा रेट तब्बल पाच ते सात हजारांपर्यंत गेल्याचेही बोलले जात आहे. या निवडणूकीच्या निमित्ताने भुसावळात प्रथमच महाविकास आघाडीचा प्रयोग राबवला जात आहे. महाविकास आघाडी विरुध्द भारतीय जनता पार्टी असा रंगतदार सामना येथे पहायला मिळत आहे.

सर्व गटात सरळ, एका गटात चौरंगी लढत
बाजार समितीमध्ये 18 जागा आहेत. यातील 11 जागा सोसायटी मतदार संघाच्या आहेत. यातील सात जागा सर्वसाधारण, दोन महिला राखीव, एक ओबीसी, एक अनूसुचित जाती जमाती अशा आहेत. ग्रामपंचायत मतदार संघातून चार जागा असून त्यात दोन सर्वसाधारण, एक आर्थिक दुर्बल घटक व एक अनुसूचित जाती अशा असतील. व्यापारी संचालक गटातून दोन तर हमाल मापाडी गटातून एक अशा जागा जागा राहतील. या सर्वच जागांवर सरळ तर सहकारी संस्था विमुक्त जाती, भटक्या जमाती मतदार संघातून चौरंगी लढत रंगली आहे.

मतदार आज प्रकट
बाजार समिती निवडणूकीच्या निमित्ताने मतदारांना लक्ष्मी दर्शनासोबतच पर्यटनाचा योग आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोन्ही पॅनलने मतदारांना जमवून सोमवारपासूनच सहलीला पाठवले आहे. आता थेट मतदानाच्या दिवशीच अर्थात आज सकाळी आठ वाजेनंतर मतदान केंद्रावर जावून आपल्या मतदानाचा हक्क बजावतील. या निवडणूकीत प्रत्येक मतदार संघातील एक- एक मत महत्वाचे असल्याने बाहेरगावी स्थायीक असलेल्या मतदारांचाही शोध घेवून उमेदवार त्यांच्यापर्यंत प्रचारासाठी पोहोचले आहेत.

व्यापारी, हमाल गटात चुरस
बाजार समिती निवडणूकीत सर्वच गटात चुरशीची लढत आहे. मात्र सर्वाधिक चूरस व्यापारी व हमाल मापाडी मतदार संघात आहे. व्यापारी गटात दोन जागांसाठी चार उमेदवार रिंगणात आहेत तर हमाल मापाडी मतदार संघात एका जागेसाठी दोन उमेदवार रींगणात आहे. शहरात व्यापारी वर्ग अधिक असल्याने या मतदार संघाची भुसावळ शहरात अधिक चर्चा आहे.