भुसावळ शहराचा पारा 43.3 अंशावर

भुसावळ : राज्यात सर्वाधिक हॉट शहर म्हणून ओळख असलेल्या भुसावळ शहराचा पारा बुधवारी तब्बल 43.3 अंशावर नोंदवण्यात आल्याची माहिती शहरातील केंद्रीय जल आयोगाच्या कार्यालयाने दिली. एप्रिल महिन्यातच शहराचा पारा 43 अंशाहून अधिक पुढे गेल्यानंतर मे महिन्यात काय होणार? या चिंतेने शहरवासीयांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. तापमानाचा पारा 43 अंशावर पोहोचताच अंगाची लाहीलाही होत असून दुसरीकडे शीतपेयांना मोठ्या प्रमाणावर मागणी वाढली आहे. तापमानाचा पारा आणखीन वाढण्याची भीती आहे.

 

दिवसागणिक वाढतेय शहराचे तापमान

भुसावळसह विभागात गेल्या पंधरवड्यात ढगाळ वातावरणामुळे तापमानाचा पारा काही अंशी कमी झाला तर भुसावळचे कमाल तापमान 34 अंशांपर्यंत आले मात्र आता दिवसागणिक आकडेवारी पाहता तापमानाचा स्तर अधिकच वाढतच असल्याने शहरवासीयांमध्ये चिंता पसरली आहे. नागरीक सकाळच्या वेळी वा सायंकाळी उशिरानंतर घराबाहेर पडत असून दुपारच्या वेळी रस्त्यांवर शुकशुकाट जाणवत आहे. वाढत्या तापमानामुळे अंगाची लाहीलाही होत आहे. तापमानामुळे शहराच्या जनजीवनावर परीणाम होत असून बाजारातही मंदीचे वातावरण आहे तर सकाळी 11 वाजेनंतर बाजारात ग्राहक येत नसल्याचे चित्र आहे. वाढत्या उन्हामुळे आईसक्रीम, ऊसाचा रस, मठ्ठा आदी शितपेयांना मागणी वाढली आहे.

 

जळगावचा पारा 42 अंशावर

वेलनेस वेदरचे निलेश गोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी, भुसावळसह जळगाव, भडगाव, फैजपूर, एरंडोल, पारोळा, वरणगाव, पाचोरा तापमान मंगळवारी 42 अंशावर पोहोचले तर अमळनेर, बोदवड, चोपडा, चाळीसगाव, धरणगाव, जामनेर, मुक्ताईनगर, रावेर व यावल शहराचा पारा 41 अंश राहिला.