भुसावळ रेल्वेत हेड क्लर्कची नोकरी लावून देतो, असे आमिष दाखवत भुसावळातील सेवानिवृत्त रेल्वे पोलिसाची नऊ लाख ६४ हजार रुपये उकळून फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी शहरातील प्रशांत लक्ष्मीनारायण अग्रवाल (गडकरी नगर, भुसावळ) विरोधात भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्यास अटक केली आहे. संशयीताला मंगळवारी भुसावळ सत्र न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
असे आहे फसवणूक प्रकरण
वसंत जानबाजी ढोणे (६५, जुना टोल नाका, फेकरी) हे लोहमार्ग पोलिसातून २०१७ मध्ये सेवानिवृत्त झाले आहेत. २४ डिसेंबर २०२२ रोजी त्यांच्या ओळखीतील रेखाबाई सुनील सोनवणे (भुसावळ) भेटल्या व त्यांनी आपला मुलगा नोकरीला लागला असून तुमच्या मुलालाही नोकरीला लावायचे असेल तर माझ्या ओळखीचे प्रशांत लक्ष्मीनारायण अग्रवाल (गडकरी नगर, खडका रोड भुसावळ) आहेत त्यांच्या माध्यम ातून काम होईल व आम्हीदेखील मुलासाठी त्याच्याकडे पैसे भरल्याचा विश्वास दिला.
२५ डिसेंबर २०२२ रोजी दुपारी १२ वाजत संशयीत प्रशांत अग्रवालची भेट घेतल्यानंतर त्याने मुलाला रेल्वेत हेड क्लर्कची नोकरी लावून देतो मात्र त्यासाठी सात लाख रुपये लागतील, असे सांगितले व नऊ महिन्यात ऑर्डर येईल मात्र त्यासाठी आधी चार लाख व ऑर्डर आल्यानंतर तीन लाख रुपये द्यावे लागतील, असे सांगितले.
बनावट ऑर्डर, अधिकाऱ्यांच्या नावाने उकळले पैसे
ठरल्याप्रमाणे २६ डिसेंबर रोजी संशयीत प्रशांतच्या सांगितल्यावरून हर्षना मेहता (शिवाजी नगर, भुसावळ) यांच्याकडे चार लाख रुपये देण्यात आले तसेच आठ दिवसात मुलाची परीक्षा होणार असल्याचे सांगून पुन्हा २० हजार रुपये आरोपीने मेहता यांच्याकडे जमा करण्यास सांगितले तर ६ जून २०२३ रोज मुलाचे काम झाल्याचे सांगत आरोपीने पेढे व तीन लाख मागितल्याने ते बियाणी चेंबर्स येथे आरोपीला देण्यात आले. २० जून रोजी आरोपीने दिलेले पैसे कमी पडत असल्याचे सांगत ५० हजार रेखा सोनवणे यांच्याकडे देण्यास सांगितल्याने पुन्हा ४० हजार रुपये देण्यात आले. २६ सप्टेंबर २०२४ रोजी आरोपी घरी आला व त्याने डीआरम पांडे यांनी एक लाख २० हजार रुपये भरण्यास सांगितले असल्याने आजच पैसे भरा म्हणून सांगितल्याने व वारंवार फोन येत असल्याने डीडीद्वारे बालाजी सेंटरमधून रक्कम ट्रान्सपर करण्यात आली. आरोपीला नोकरीची वारंवार विचारणा केल्यानंतर त्याने रेल्वेची डुप्लीकेट ऑर्डर आणून दिली मात्र फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने ढोणे यांनी पोलिसात धाव घेतली.
आरोपीला तीन दिवस पोलीस कोठडी
ढोणे यांनी सोमवारी बाजारपेठ पोलिसात तक्रार दिल्यावरून प्रशांत अग्रवाल विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. बाजारपेठ पोलिसांनी आरोपीला सोमवारी रात्री अटक केल्यानंतर मंगळवारी त्यास न्या. एस.बी. तिवारी यांच्या न्यायासनापुढे हजर केले असता २५ एप्रिलपर्यंत अर्थात तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. सरकार पक्षातर्फे अॅड. ईश्वर पाटील तर संशयीतातर्फे अॅड. सत्यनारायण पाल यांनी बाजू मांडली. तपास पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस
उपनिरीक्षक मंगेश बेंडकोळी करीत आहे.