भुसावळ : भुसावळ पालिकेवर गेल्या दोन वर्षांपासून प्रशासकराज असल्याने नागरीकांच्या तक्रारी प्रलंबित राहू नये याबाबत नूतन प्रशासक तथा प्रांताधिकारी जितेंद्र पाटील अत्यंत आग्रही आहेत शिवाय अस्वच्छतेबाबत व दांडी मारणार्यांवर त्यांनी आतापर्यंत कर्मचार्यांवर धडक कारवाई केल्याने दांडी बहाद्दर कर्मचारी वठणीवर आले आहेत. सोमवारी दुपारी दिड वाजेच्या सुमारास अचानक प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांनी पालिका कार्यालय गाठल्यानंतर कर्मचार्यांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली. पालिकेत प्रवेश केल्यानंतर लागलीच प्रशासकांनी उपस्थित असलेल्या कर्मचार्यांचा आढावा घेत हजेरी मस्टर तपासले मात्र सर्व कर्मचारी यावेळी कर्तव्यावर हजर असल्याचे दिसून आल्याचे सूत्रांनी सांगितले. यावेळी प्रशासकांनी पालिका मुख्याधिकार्यांना शहरातील अस्वच्छतेबाबत सूचना केल्या तसेच पालिकेत काम घेवून आलेल्या नागरीकांच्या तक्रारी प्रलंबित राहणार नाही, याच्या सूचना केल्या तसेच ज्या रस्त्यांची कामे झाली नाही त्याबाबत संबंधिताना प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना केल्या.
प्रशासक येताच कर्मचारी जागेवर
प्रशासक जितेंद्र पाटील यांनी यापूर्वी आरोग्य निरीक्षक, स्वच्छता मुकादम यांच्यावर कर्तव्यावर कसूर केल्याप्रकरणी कारवाई केली असून पालिका अधिकार्यांचे एक दिवसीय वेतनही कपात केले आहे त्यामुळे कर्मचार्यांच्या गोटात प्रशासक केव्हाही सरप्राईज व्हिजीट करीत असल्याची धास्ती असल्याने सोमवारी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सुमारे 56 अधिकारी, कर्मचारी जागेवरच असल्याचे प्रशासकांनी केलेल्या पाहणीत आढळले. याप्रसंगी प्रशासकांनी पालिकेत प्रवेश करीत हजेरी मस्टर तपासले तसेच उपस्थित कर्मचार्यांची गणना करीत उपमुख्याधिकारी व ओएस यांच्याकडून आढावा घेतला.
शहरात स्वच्छतेबाबत प्रशासक गंभीर
यापूर्वी यापूर्वी रस्ते तसेच गटारी स्वच्छ केल्या जात नसल्याच्या तक्रारी प्रशासकांपर्यंत आल्याने शहर स्वच्छतेला सर्वाधिक महत्त्व दिले आहे शिवाय त्यानुषंगाने कामावर उपस्थित नसलेल्या कर्मचार्यांवर तसेच सफाई कामगारांवर कारवाईचा बडगाही उचलला आहे. सोमवारी दुपारी मुख्याधिकारी महेश वाघमोडे, उपमुख्याधिकारी लोकेश ढाके तसेच ओएस परवेज शेख यांच्याशी प्रांताधिकारी तथा प्रशासक असलेल्या जितेंद्र पाटील यांनी शहर स्वच्छतेचा आढावा घेतला तसेच अस्वच्छता कुठल्याही सबबीवर खपवून घेणार नसल्याचे संंबंधिताना बजावले.
रस्त्यांबाबत प्रस्ताव मागवले
शहरातील 12 कोटींच्या निधीतील अनेक रस्त्यांची कामे अपूर्ण असून हा विषय न्यायप्रविष्ट असल्याने ही कामे रेंगाळली आहेत तर अनेक भागातील रस्त्यांची कामे झाली नसल्याने नागरीकांमध्ये पालिका प्रशासनाबद्दल प्रचंड रोष आहे शिवाय पावसाळ्यात अनेक कॉलनी भागात पायी चालता येणार नाही, अशी स्थिती असल्याने अशा रस्त्यांबाबत तातडीने प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना प्रशासकांनी अधिकार्यांना केल्या. सार्वजनिक बांधकाम अंतर्गत या रस्त्यांची कामे करण्याचे पालिका प्रशासनाचे नियोजन आहे.
नागरीकांना सुविधा देण्याला प्राधान्य : प्रशासक
भुसावळकरांना प्रशासक या नात्याने सुविधा देण्यास आपले प्राधान्य आहे. रस्ते, पाणी, स्वच्छता याकडे लक्ष केंद्रीत केले आहे. शहरातील अस्वच्छता खपवून घेणार नसल्याच्या सूचना पालिका अधिकार्यांना करण्यात आल्या तसेच कर्मचार्यांची हजेरी तपासली, असे प्रशासक जितेंद्र पाटील म्हणाले. पालिकेत तक्रार घेवून आलेल्या नागरीकांच्या तक्रारींचे तत्काळ निरसन करण्याच्या सूचना केल्या असून यानंतरही पुन्हा सरप्राईज देवून पालिका कामकाजाचा आढावा घेवू, असे प्रांताधिकारी जितेंद्र पाटील म्हणाले.