Bhusawal Seemi case : सीमी प्रकरणात अटकेतील शिक्षकाचा अहवाल प्रशासन अधिकाऱ्यांनी मागितला

Bhusawal Seemi case :   सीमी प्रकरणात दाखल असलेल्या गुन्ह्यात 22 वर्षांपासून फरार असलेल्या भुसावळातील न.पा.उर्दू शाळेतील शिक्षकाला न्यू दिल्लीतील विशेष सेलच्या पोलिसांनी गुरुवारी दुपारी अटक केली होती. दरम्यान, या कारवाईनंतर शुक्रवारी नगरपालिका शिक्षण विभागाच्या  प्रशासन अधिकाऱ्यांनी उर्दू शाळा क्रमांक 19 च्या मुख्याध्यापकांना पत्र देत घडल्या प्रकाराबाबत अहवाल मागितला आहे. हा अहवाल प्रशासन अधिकाऱ्यांना मिळाल्यानंतर तो पालिका मुख्याधिकाऱ्यांना सादर होईल व त्यानंतर पुढील कारवाईची दिशा ठरेल, असे मुख्याधिकारी महेश वाघमोडे यांनी सांगितले. दरम्यान, भुसावळातून संशयित हनीफ शेख मोहम्मद हनीफ यास अटक करून निघालेली दिल्ली पोलिसांची टीम शुक्रवारी रात्री उशिरा पोहोचल्याने शनिवारी सकाळी संशयिताला न्यायालयात हजर करण्यात येईल.

 

 

भुसावळातील उर्दू शाळेच्या मुख्याध्यापकांना प्रशासनाचे पत्र

nन.पा.शाळेचे प्रभारी शिक्षण अधिकारी तुषार प्रधान यांनी घडलेल्या प्रकारानंतर उर्दू शाळेच्या मुख्याध्यापक पत्र दिले आहे. त्यात नेमका काय प्रकार घडला व कोणत्या कारणान्वये शिक्षकांवर अटकेची कारवाई झाली याबाबत विचारणा केली असून त्याबाबत अहवाल पाठवण्याचे सूचित केले आहे. मुख्याध्यापकांकडून अहवाल येताच तो मुख्याधिकाऱ्यांकडे सादर होईल व त्यानंतर पुढील कारवाई होणार आहे. मुख्याधिकारी महेश वाघमोडे म्हणाले की, 48 तासांपेक्षा जास्त कालावधीत कुणी अटकेत राहिल्यास त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली जाते. संबंधित शिक्षकांबाबत अद्याप आपल्यापर्यंत अहवाल आलेला नाही व तो आल्यानंतर कारवाईची दिशा ठरेल, असेही त्यांनी सांगितले.

 

 

उर्दू शाळेत शिक्षक

संशयित हनीफ शेख मोहम्मद हनीफ हे भुसावळातील खडका रोडवरील उर्दू हायस्कूलच्या 19 क्रमांकाच्या शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. शिक्षकावरील कारवाईने शहरात खळबळ उडाली.

 

फरार घोषित होताच पोलिसांकडून कारवाई

दिल्लीतील न्यू फ्रंट कॉलनी पोलीस ठाण्यात संशयित हनीफ शेख मोहम्मद हनीफ विरोधात 2001 मध्ये त्यावेळच्या सीमी प्रकरणात गुन्हा दाखल आहे. संशयिताने 2001 मध्ये प्रतिबंधित दहशतवादी संघटना ‌‘सीमी’चे निघणारे मासिक ‌‘इस्लामिक मुव्हमेंट’मध्ये प्रक्षोभक लिखाण केल्याच्या आरोपान्वये हा गुन्हा दाखल आहे, मात्र 22 वर्ष या गुन्ह्यात संशयित हजर न झाल्याने न्यायालयाने त्यास फरार घोषित केले.

 

 

आज न्यायालयात हजर करणार

दिल्ली विशेष सेलच्या पोलिसांचे विशेष पथक संशयित हनीफ शेख मोहम्मद हनीफ यास गुरुवारी सायंकाळी शहरातून घेवून गेले मात्र शुक्रवारी सायंकाळी उशिरापर्यंत हे पथक दिल्लीत पोहोचले नव्हते. विशेष पोलिसांनी संशयिताला दिल्ली नेण्यासाठी भुसावळ सत्र न्यायालयातून यापूर्वीच 48 तासांचा ट्रान्झीट रिमांड घेतला असून त्यास शनिवारी न्यायालयात हजर करण्यात येईल, अशी माहिती निरीक्षक पवन कुमार यांनी दिली.