भुसावळात बँक लिपिकानेच लावला बँक ऑफ इंडियाला दोन कोटींचा चुना

 भुसावळ : भुसावळातील बँक ऑफ इंडिया शाखेला बँकेच्या लिपिकानेच दोन कोटींचा चुना लावल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. या प्रकरणी कर्मचार्‍यासह त्याच्या पत्नीविरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने बँकेच्या खातेदारांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. शहरात यापूर्वी मणप्पुरम गोल्ड बँकेतील परप्रांतीय मॅनेजरने लाखोंचे सोने लंपास करून चुना लावल्याची घटना ताजी असतानाच आता बँक ऑफ इंडियातही हा प्रकार घडला आहे. आरोपीने गेल्या अनेक वर्षांपासून बंद असलेल्या खात्यांची तपशील गोळा करीत त्यातील रक्कम खात्यात वळती करून तब्बल दोन कोटी एक लाख 20 हजार 934 रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. आरोपी बँक लिपिकाला अटक करण्यात आली आहे.

अशी उघडकीस आली फसवणूक
शहरातील विठ्ठल मंदिर वॉर्डातील बँक ऑफ इंडिया शाखेतील लिपिक व आरोपी योगेश प्रकाश भिलाणे याने गेल्या दहा वर्षात ज्या बचत खात्यांमध्ये व्यवहार झालेला नाही तसेच वर्षानुवर्षे पेन्शन घेण्यासाठी न आलेल्या तसेच एफ.डी.ची रक्कम न वटवण्यास आलेल्या खात्यांचा अभ्यास करीत या खात्यांमधील रक्कम पत्नीच्या नावाने उघडलेल्या बनावट खात्यात स्वतःच्या लॉगीन आयडीद्वारे वळती केली. अलीकडेच बँकेचे ज्येष्ठ ठेवीदार एफ.डी.ची रक्कम घेण्यासाठी बँकेत आल्यानंतर त्यांना खाते बंद करण्यात आल्याचे व एफ.डी.विड्राल झाल्याचे सांगताच मोठा मानसिक धक्का बसला मात्र आपण खाते बंद केलेले नाही शिवाय बँकेकडे एफ.डी.ची रक्कम घेणे असल्याचे व त्याबाबत कागदपत्रे सादर केल्यानंतर घडलेला प्रकार उघडकीस आला. आरोपी भिलाणे याने बँकेतील बचत खातेदारांसह पेन्शन खातेदारक तसेच एफ.डी.ठेवलेल्या मात्र गेल्या दहा वर्षांपासून वापरात नसलेल्या खातेदारांच्या खात्यातील रक्कम वळती केल्याचे बँकेने केलेल्या तपासणीत निष्पन्न झाले.

दोन कोटींचा लागला चुना
बँकेचे मॅनेजर योगेश रामदास पाटील (साने गुरूजी कॉलनी, भुसावळ) यांच्या फिर्यादीनुसार, आरोपी योगेश प्रकाश भिलाणे व त्याची पत्नी तेजश्री भिलाणे (दोन्ही रा.देवराम नगर, कमला पार्क, जळगाव) यांनी बँक ऑफ इंडिया शाखेत 11 जानेवारी 2021 ते 3 नोव्हेंबर 2022 या कालावधीतसंगनमताने बनावट दस्तावेज तयार करुन मयत इसमाच्या नावे असलेल्या बँक खात्याचा गैरवापर करीत बँक शाखेतील वेगवेगळ्या बँक खात्यातील जमा रकमा, एफडी व बँक खात्यातील जुन्या रकमा शाखा व्यवस्थापक यांच्या परवानगीविना वळत्या करून घेतल्या शिवाय व्यवहारासाठी बँकेतील विड्रॉल स्लिपा, इतर दस्तावेज व बनावट तयार केलेल्या बँक खाते उघडण्याचा फॉर्म, केवायसीचे कागदपत्र गहाळ करून पुरावादेखील नष्ट केला. भुसावळ बाजारपेठ पोलिस स्टेशनला याप्रकरणी गुरनं.68/23 भा.द.वि. 409, 420, 421, 424, 463, 464, 465, 467, 468, 469, 470, 471, 477 अ, 201, 34 या कलमान्वये जळगावच्या दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. फसवणुकीच्या गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्याने बुधवारी रात्री उशिरा हा गुन्हा जळगाव आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला तपास आर्थिक गुन्हे शाखेचे उपविभागीय पोलिस अधिकारी भास्कर डेरे करीत आहेत.