भुसावळात भर दिवसा घरफोडी ; चोरट्यांनी लांबविले 21 तोळे सोने

तरुण भारत लाईव्ह न्युज भुसावळ : शहरातील जळगाव रोडवरील मुक्ताई कॉलनीतील मंगलमूर्ती हाईटस्मध्ये शेतकरी तुलसीदास चुंद्रकांत चौधरी (67) हे वडिलांच्या वर्षश्राद्धासाठी आमोदा येथे गेल्यानंतर चोरट्यांनी बंद घर फोडत तब्बल 21 तोळे वजनाचे दागिने लांबवल्याने शहरात खळबळ उडाली. या प्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

भर दिवसा साडेपाच लाखांचा ऐवज लांबवला

चोरट्यांनी 48 ग्रॅम वजनाचा एक लाख 20 हजार रुपये किंमतीचा नेकलेस, 50 हजार रुपये किंमतीचा सोन्याचा नेकलेस, 75 हजार रुपये किंमतीचा नेकलेस, 75 हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र, 12 हजार 500 रुपये किंमतीच्या अंगठ्या, 22 हजार 500 रुपये किंमतीची अंगठी, 12 हजार 500 रुपये किंमतीचा सोन्याचा कॉईन, 25 हजार रुपये किंमतीचा दहा ग्रॅमचा वेढा, 50 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे लॉकेट, 12 हजार 500 रुपये किंमतीच्या सोन्याच्या रींगा, 12 हजार 500 रुपये किंमतीच्या सोन्याच्या दोन लहान अंगठ्या, अडीच हजारांचे कानातील झुमके, दहा हजार रुपये किंमतीचे चांदीचे कॉईन तसेच 60 हजारांची रोकड असा एकूण पाच लाख 40 हजार रुपये किंमतीचा ऐवज लांबवला. सुमारे 20 तोळे वजनाचे दागिणे लांबवण्यात आले असून त्याचे बाजारमूल्य सुमारे 12 लाखाहून अधिक आहे मात्र पोलीस तक्रारीत जुन्या दरानुसार ऐवजांचे मूल्य दर्शवण्यात आले आहे.

पोलीस अधिकार्‍यांची धाव

डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे, शहर पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक विनोदकुमार गोसावी व डीबी पथकातील गोस्वामी, संदेश निकम, चंद्रशेखर गाडगीळ व पोलीस कर्मचार्‍यांसह डीवायएसपी यांच्या पथकातील हवालदार सुरज पाटील, रमण सुरळकर आदींनी धाव घेत पाहणी केली. मंगळवारी व बुधवारी या भागातील सीसीटीव्ही कॅमेरे कसून तपासण्यात आले.