नवी दिल्ली : कर्मचारीभविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) आर्थिकवर्ष 2022-23 करिता EPF खात्यांसाठी 8.15 टक्के व्याजदराची घोषणा केली आहे. यापूर्वी हा व्याजदर 8.10 टक्के होता. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने भविष्य निर्वाह निधी योगदानासाठी व्याजदरातील वाढीला मंजुरी दिली आहे. देशातील सुमारे साडेसहा कोटी कर्मचाऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे.
ईपीएफओने जारी केलेल्या एका नोटिफिकेशनमध्ये म्हणण्यात आले आहे की, भारत सरकारच्या श्रम आणि रोजगार मंत्रालयाने ईपीएफ योजनेतील प्रत्येक सदस्याच्या खात्यात 2022-23 वर्षासाठीचे व्याज जमा करण्यासाठी कर्मचारी भविष्य निधी योजना, 1952 च्या पॅरा 60 (1) अंतर्गत केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे.
EPFO खात्यावर मिळणाऱ्या व्याजदर वाढीच्या घोषनेनंतर, संबंधित सर्क्युलर सोमवारी (24 जुलैला) जारी करण्यात आले आहे. महत्वाचे म्हणजे, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या बोर्डाने आर्थिक वर्ष 2022-23 साठी EPF Account वर 8.15 टक्के व्याज निश्चित केले होते आणि मंजूरीसाठी अर्थमंत्रालयाकडे पाठविले होते. साधारणपणे, व्याजाचे पैसे ऑगस्ट 2023 पर्यंत खात्यावर येऊ लागतील.