पुणे : गेल्या महिन्याभरापासून राज्यात चर्चेत असलेल्या कसबा पोटनिवडणुकीसाठी आज मतमोजणी पार पडली. प्रतिष्ठेची केलेल्या या निवडणुकीत भाजपाला मोठा धक्का बसला आहे. मतमोजणीमध्ये मविआचे उमेदवार काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांचा मोठा विजय झाला आहे. गेल्या २८ वर्षांपासून भाजपाच्या हातात असलेलाा हा मतदारसंघ आता काँग्रेसच्या ताब्यात गेला आहे. रवींद्र धंगेकरांच्या रुपाने महाविकास आघाडीला भाजपावर मोठा विजय मिळाल्याचं दिसून येत आहे. रवींद्र धंगेकरांनी भाजपाच्या हेमंत रासनेंचा तब्बल ११ हजार ०४० मतांनी पराभव केला आहे.
कसब्यामध्ये मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर तिथे पोटनिवडणुका लागल्या. या निवडणुकीत मुक्ता टिळक यांच्या कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी द्यावी, अशी मागणी केली जात होती. खुद्द टिळक कुटुंबातूनही तशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती. मात्र, त्याऐवजी भाजपाकडून माजी आमदार हेमंत रासने यांना उमेदवारी दिल्यामुळे कसब्यात भाजपाविरोधी नाराजी असल्याचं सांगितलं जात होतं. अखेर आज मतमोजणीनंतर ही नाराजी निकालाच्या रुपाने दिसून आल्याचं सांगितलं जात आहे.
दरम्यान, तब्बल २८ वर्षांनंतर कसब्यामध्ये आमदारकी भाजपाकडून काँग्रेसकडे आली आहे. याआधी १९९२ च्या निवडणुकीत कसब्यामध्ये काँग्रेसचा उमेदवार निवडून आला होता. २००९ मध्येही कसब्यामध्ये रवींद्र धंगेकरांनी गिरीश बापट यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. मात्र, त्यावेळी त्यांना विजय मिळवण्यात अपयश आलं. सन २००९ ची विधानसभा निवडणूक रवींद्र धंगेकर यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून लढविली होती. त्यावेळी त्यांनी गिरीश बापट यांना कडवे आव्हान दिले होते.
निवडणुकीचा निकाल धक्कादायक – भाजपा उमेदवार हेमंत रासने
कसबा मतदारसंघात दरवेळी तिरंगी लढत व्हायची यंदा पहिल्यांदाच दोन जणांमध्ये थेट लढत झाली. मतदारांपर्यंत पोहचण्यात मी अपयशी ठरलो. मला या निवडणुकीच्या निकालाचं आत्मचिंतन करून कुठे कमी पडलो हे पाहावे लागेल. कुठलीही निवडणूक नेते गांभीर्याने घेत असतात. निकाल माझ्यासाठी धक्कादायक आहे, जिथे आम्ही कमी पडलो तिथे काम करू अशी प्रतिक्रिया भाजपा उमेदवार हेमंत रासने यांनी दिली.