---Advertisement---
local Body Elections 2025 : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला असून पक्षातील अनेक निष्ठावंत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिंदे गटात जाहीर प्रवेश केला आहे.
उद्धव ठाकरे गटाच्या राज्यसंघटक अॅड. ललिता श्याम पाटील यांनी अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक पराग पाटील व कार्यकर्त्यांसह शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.
पाचोरा-भडगाव मतदारसंघातील शिवसेना जिल्हा प्रमुख दीपकसिंग राजपूत, शेतकरी सेना जिल्हाप्रमुख अरुण पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मुंबई येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला.
या प्रवेश सोहळ्यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार किशोर पाटील, शिवसेना (शिंदे गट) जिल्हाध्यक्ष रावसाहेब पाटील तसेच अन्य वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते. या मोठ्या राजकीय घडामोडीनंतर पाचोरा-भडगाव मतदारसंघातील राजकीय समीकरणांमध्ये आमूलाग्र बदल होण्याची चिन्हे दिसून येत आहेत.
पक्ष सोडून शिंदे गटात दाखल झालेल्या कार्यकर्त्यांनी यावेळी बोलताना सांगितले की, ‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार किशोर पाटील यांच्या नेतृत्वावर आमचा पूर्ण विश्वास आहे. विकासाभिमुख आणि कार्यकर्त्यांनाच केंद्रस्थानी ठेवणारी राजकारणाची दिशा आम्हाला आवडते, त्यामुळे आम्ही शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल होत आहोत.
या प्रवेशामुळे आमदार किशोर पाटील यांची संघटनात्मक ताकद आणखी वाढली असून, आगामी नगरपरिषद व जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये याचा मोठा फायदा होणार असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. पाचोरा-भडगाव मतदारसंघातील राजकारणात शिंदे गटाने आपली पकड मजबूत केली असून, या नव्या प्रवेशामुळे स्थानिक पातळीवर ठाकरेंच्या शिवसेनेसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.