नवी दिल्ली : सध्या लग्नसराईचे दिवस सुरु असल्याने सोने खरेदीला देखील वेग आला आहे. अशातच केंद्र सरकारने सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीच्या नियमात मोठा बदल केला आहे. ३१ मार्च २०२३ पासून दागिन्यांवर हॉलमार्क अनिवार्य असणार आहे. म्हणजेच हॉलमार्क नसलेल्या दागिन्यांची खरेदी-विक्री करता येणार नाहीय. ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार ३१ मार्चनंतर एचयुआयडीशिवाय सोन्याचे दागिने विकता येणार नाहीएत. चार अंकी आणि सहा अंकी हॉलमार्किंगबाबत ग्राहकांमधील संभ्रम दूर करण्यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे.
हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन क्रमांक हा दागिन्यांची शुद्धता दर्शवितो. हा ६ अंकी अल्फान्यूमेरिक कोड आहे. याद्वारे ग्राहकांना सोन्याच्या दागिन्यांची सर्व माहिती मिळते. हा नंबर प्रत्येक दागिन्यावर लावला जातो. या कोडच्या माध्यमातून फसवणुकीच्या घटनांमध्ये बरीच घट झाली आहे. सोनारांसाठी देशभरात १३३८ हॉलमार्किंग सेंटर खुली करण्यात आली आहेत. जर आपण सोनं खरेदीसाठी बाजारात जात असाल तर हॉलमार्क बघूनच सोनं खरेदी करा. सोन्याची शुद्धता चेक करण्यासाठी आपण सरकारी अॅपचाही वापर करू शकता. ‘BIS Care app’ च्या माध्यमाने आपण सोन्याची शुद्धता चेक करू शकता. याशिवाय याच अॅपच्या माध्यमाने आपण तक्रारही करू शकता.
लग्नसराईच्या काळात सोन्याचे दर सातत्याने कमी होताना दिसत आहेत. ग्लोबल मार्केटसंदर्भात बोलायचे झाल्यास, येथेही सोन्याच्या दरात घसरण बघायला मिळाली आहे. येथे सोन्याचा दर १८०६.५० डॉलर प्रति ओंसवर होता. तसेच, यूएस गोल्ड फ्यूचर्स देखील १,८२४.९० डॉलर प्रति औंसवर आहे. याशिवाय चांदी २०.७५ डॉलर प्रति औंसवर आहे. आपण घरबसल्याही सोन्याचा दर चेक करू शकतात. इंडियन बुलियन अँड ज्वैलर्स असोसिएशननुसार आपण केवळ ८९५५६६४४३३ या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन दर जाऊन घेऊ शकतात. आपण ज्या क्रमांकावरून मेसेज करता त्याच क्रमांकावर आपल्याला मेसेज येईल.