हमीरपूर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी मानहानीच्या एका प्रकरणात भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री प्रेमकुमार धुमल यांची माफी मागितली आहे. हल्लीच जयराम रमेश यांनी धुमल यांच्या घरी जाऊन त्यांची लेखी माफी मागितली. याबाबतचा खटला हिमाचल प्रदेशच्या उच्च न्यायालयामध्ये विचाराधीन आहे.
काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी २ ऑगस्ट २०१५ रोजी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन माजी मुख्यमंत्री प्रेम कुमार धुमल आणि केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्यावर आरोप केले होते. धर्मशाला येथील क्रिकेट स्टेडियमसाठी या दोघांनी जमीन हडप केली, त्यामुळे राज्याचं १०० कोटी रुपयांचं नुकसान झालं, असा आरोप रमेश यांनी केला होता. त्यावेळी अनुराग ठाकूर हे हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष होते.
दरम्यान, रमेश यांनी केलेल्या आरोपांविरोधात प्रेमकुमार धुमल यांनी हिमाचल प्रदेशमधील हायकोर्टात १०० कोटी रुपयांची मानहानीची याचिका दाखल केली होती. त्यानंतर कोर्टात अनुपस्थित राहिल्याने जयराम रमेश यांना कोर्टाने ५ हजार रुपयांचा दंड ठोठावला होता. त्यानंतर रमेश यांनी आपण स्वत: याविषयी धुमल यांच्याशी बोलू, असे न्यायाधीशांना सांगितले. त्यानंतर जयराम रमेश यांनी हमिरपूर येथे जात धुमल यांची भेट घेतली. त्यानंतर माफी मागत या संपूर्ण प्रकरणावर पडदा पाडण्याचा प्रयत्न केला.
या भेटीबाबत प्रेमकुमार धुमल यांनी सांगितले की, सुमारे १० दिवसांपूर्वी मानहानीच्या प्रकरणाची सुनावणी हिमाचल हायकोर्टामध्ये होती. त्यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी हायकोर्टामध्ये मला भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर जयराम रमेश हमीरपूर येथे आले. तिथे झालेल्या भेटीवेळी जयराम रमेश यांनी त्यांनी केलेल्या विधानांबाबत माफी मागितली. तसेच मी जे काही आरोप केले ते सर्व निराधार असल्याचे सांगितले. त्यांनी माफी मागताना यापुढे त्यांच्याकडून अशी चूक होणार नाही, असे सांगितले.