मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांनी मुंबईच्या दौर्यावर येत आहेत. पंतप्रधानांच्या दौर्यापूर्वी भाजपा आणि शिंदे गटाने वातावरण निर्मिती करण्यास सुरुवात केली आहे. शिंदे गटाने थेट मातोश्रीबाहेरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कटआऊट लावले आहेत. शिंदे, फडणवीसांच्या कटआऊटसोबतच शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचेही कटआऊट आहेत.
मुंबई महापालिकेवर गेली अनेक वर्षे शिवसेनेची सत्ता होती. त्यावर आता शिंदे गट आणि भाजपाचा डोळा आहे. गेल्या वर्षी मार्चमध्ये पालिकेची मुदत संपली होती. यामुळे लवकरच आता निवडणुका होणार आहेत. यामुळे वांद्रे उपनगरातील शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या घराजवळ पंतप्रधान मोदी, एकनाथ शिंदे आणि इतर नेत्यांचे मोठे कटआउट्स लावण्यात आले आहेत.
१९ जानेवारीला मोदी विविध प्रकल्पांसाठी पायाभरणी करण्यासाठी आणि शहराच्या वाहतूक पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करणार्या दोन मेट्रो मार्गांचे उद्घाटन करण्यासाठी येत आहेत. पंतप्रधानांच्या दौर्यामुळे कार्यकर्त्यांचे मनोबल वाढेल आणि प्रलंबित असलेल्या महापालिका निवडणुकीसाठी भाजप आणि शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बाळासाहेबांची शिवसेना पक्षासाठी ’अनुकूल खेळपट्टी’ तयार करण्यात मदत होईल, असे भाजपच्या एका नेत्याने सांगितले.