अपर पोलीस महासंचालकांचा मोठा निर्णय, आता वयोवृद्ध कैद्यांना…

मुंबई : महाराष्ट्रातील कारागृहातील कैद्यांच्या दृष्टीकोणातून अतिशय महत्त्वाची बातमी आहे. राज्याचे अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक यांनी मोठा निर्णय घेतला असून, आता या निर्णयामुळे कारागृहातील वयोवृद्ध कैद्यांना चांगली झोप लागणार आहे.  

राज्याचे अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा अमिताभ गुप्ता यांनी कारागृह विभागाचे सर्व कारागृह उपमहानिरीक्षक आणि सर्व कारागृहांचे अधीक्षक यांच्यासोबत 15 फेब्रुवारी रोजी बैठक घेतली होती. यावेळी ५० किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेल्या सर्व न्यायाधीन कैद्यांना साधारणतः जाड बेड (अंथरून) तसेच उशी स्वखर्चाने आणण्याची परवानगी देण्यात आली आहे.

कारागृह विभागातील अडीअडचणी जाणून घेवून त्या दूर करण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी अमिताभ गुप्ता यांनी आढावा बैठक आयोजित केली होती. कारागृहातील ५० वर्ष आणि त्यापेक्षा जास्त वय असलेले बंदी आणि काही वयोवृद्ध बंदी आजारी असतात. अशा कैद्यांच्या अडचणी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान वयोवृद्ध कैद्यांना बेड आणि उशी आणण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरी त्यासाठी तुरुंग प्रशासनाने काही निकष ठरवले आहेत. यासाठी तुरुंग प्रशासनाकडून बेडच्या उंची आणि रुंदीसाठी परिपत्रकही जारी केले आहे, जेणेकरून सर्व कैद्यांच्या बेडचा आकार समान असेल.