UGC विभागाचा मोठा निर्णय : UG आणि PG अभ्यासक्रमांमध्ये भारतीय ज्ञान प्रणालीचा समावेश

Decision by UGC Department : युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशन (यूजीसी) विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. UG आणि PG अभ्यासक्रमांमध्ये रामायण, महाभारताचा समावेश करण्यात आला आहे.

युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशनने (यूजीसी) उच्च शिक्षण अभ्यासक्रमात भारतीय ज्ञान प्रणालीचा समावेश करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वांचा मसुदा जारी केला आहेत. या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, यूजीसीनं देशातील सर्व विद्यापीठं आणि शिक्षण संस्थांना सांगितलं आहे की, पोस्ट ग्रॅज्युएशन आणि अंडर ग्रॅज्युएशन अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना आयकेएस (इंडियन नॉलेज सिस्टिम) अभ्यासक्रम घेण्यास प्रोत्साहित केले पाहिजे. हा अभ्यासक्रम अनिवार्य क्रेडिटच्या किमान पाच टक्के असेल.

UGC ने काय सांगितले?
जे विद्यार्थी मेडिसीनमधील यूजी प्रोग्रॅम्समध्ये नावनोंदणी करतील ,  ते पहिल्या वर्षी भारतीय वैद्यक पद्धतीचा क्रेडिट कोर्स घेऊ शकतात. त्यामुळे त्यांना आयुर्वेद, योग आणि निसर्गोपचार, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथीची मूलभूत माहिती मिळेल. या विद्याशाखा अजूनही भारतीय लोकसंख्येपैकी मोठ्या भागाच्या आरोग्याच्या गरजा भागवणाऱ्या औषधांच्या परंपरा चालू ठेवत आहेत.

दुसर्‍या वर्षात गेल्यानंतर विद्यार्थी आयुर्वेद, सिद्ध, योग इत्यादींसारख्या कोणत्याही भारतीय वैद्यक पद्धतीचा थिअरी आणि प्रॅक्टिसचा दोन-सेमिस्टरचा क्रेडिट कोर्स करू शकतात.

मार्गदर्शक तत्त्वांमध्ये काही मॉडेल अभ्यासक्रमांचाही उल्लेख करण्यात आला आहे. हे अभ्यासक्रम विद्यापीठांमधील यूजी आणि पीजी अभ्यासक्रमांमध्ये समाविष्ट केले जाऊ शकतात. उदाहरणार्थ, भारतीय संस्कृतीतील मूलभूत साहित्याचा यामध्ये समावेश केला जाऊ शकतो.

या साहित्यात वैदिक कॉर्पस, रामायण, महाभारत आणि त्यांच्या महत्त्वाच्या प्रादेशिक आवृत्त्या, पुराणं, वेद यांचा अभ्यास असेल. भारतीय तत्त्वज्ञानाचे मूलभूत ग्रंथ, जैन आणि बौद्ध, भारतीय धार्मिक संप्रदायांचे मूलभूत ग्रंथ, वैदिक काळापासून वेगवेगळ्या प्रदेशातील भक्ती परंपरांपर्यंतचं सर्व साहित्य विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी उपलब्ध करून दिलं जाणार आहे.

शिक्षण, व्याकरण, छंद, निरुक्त, ज्योतिष आणि कल्प या सहा वेदांगांसह आयुर्वेद, इ.  सारख्या भारतीय ज्ञान प्रणालींचा इतर प्रवाहांतील विद्यार्थ्यांना अभ्यास करावा लागेल.

भारतीय खगोलशास्त्र शिकवण्याची आवश्यकता असलेल्या साहित्याचादेखील उल्लेख आहे. असाच एक चॅप्टर लग्न आणि त्याची गणना याबाबतदेखील असेल. “विद्यार्थ्यांना लग्नाची संकल्पना सांगा आणि लग्नासह इतर सामाजिक व धार्मिक कार्यक्रमांसाठी मुहूर्त म्हणजे विशिष्ट वेळ निश्चित करणं कसं महत्त्वाचं आहे हे विद्यार्थ्यांना समजवलं पाहिजे. काळाची अचूक गणना कशा पद्धतीने करायची आणि ती स्थिती नंतर कशी लय पावते याबद्दलही शिकवायला हवं. नंतरच्या खगोलशास्त्रज्ञांनी काललग्नाची संकल्पना मांडून त्यातून सादर केलेली अधिक अचूक सूत्रंही विद्यार्थ्यांना शिकवायला हवीत,” असं मार्गदर्शक तत्त्वांच्या मसुद्यात सांगितलं आहे.