मुंबई : शेअर बाजारात आठवड्याच्या दुसऱ्या व्यवहाराच्या दिवशी, आज मंगळवारी शेअर बाजाराची खूपच खराब सुरुवात झाली आणि बाजार उघडताच दोन्ही निर्देशांक प्रचंड घसरले. दरम्यान, बाजाराच्या घसरणीत टाटा समूहाची दिग्गज आयटी कंपनी, टीसीएस शेअरच्या किमतीत सर्वात मोठी घसरण दिसून आली.
शेअर बाजार मंगळवारी घसरणीसह उघडला. दुपारी बीएसई सेन्सेक्स ६०० पेक्षा जास्त अंकांनी तर निफ्टी २०० पेक्षा जास्त अंकांनी घसरला. दुसरीकडे, बाजार सुरू होताच सुमारे १,१४१ शेअर्समध्ये तेजी दिसून आली, तर १,०४१ शेअर्सनी घसरणीत सुरुवात केली. या कालावधीत ओएनजीसी, अदानी एंटरप्रायझेस, सन फार्मा, बजाज फायनान्स, ITC शेअर्सनी निफ्टीमध्ये तेजी नोंदवली तर टीसीएस, विप्रो, टाटा स्टील, बीपीसीएल आणि कोल इंडियाचे शेअर्स कोसळले.
बाजारातील प्रचंड घसरणीचा सर्वाधिक फटका टाटा ग्रुपची आघाडीची आयटी कंपनी टीसीएसला बसला आणि शेअर सर्वाधिक कोसळलेला बाजारात उघडताच टीसीएस शेअर सुमारे ३% घसरून ४,०३० रुपयांवर आला. टाटा सन्सने ब्लॉक डीलद्वारे टीसीएसच्या सुमारे २.३४ कोटी शेअर्सची विक्री केल्यामुळे गुंतवणूकदारांच्या भावनांवर परिणाम झाला. तर यापूर्वी सोमवार बाजार बंद झाला तेव्हा टीसीएसचा स्टॉक १.७८ टक्के घसरणीसह ४,१४४.२५ रुपयांवर स्थिरावला होता.