जळगाव । दिवाळीत उच्चांकी पातळी गाठणाऱ्या सोने आणि चांदी दरात आता मोठी घसरण झालीय. अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर तिसऱ्या दिवशी देखील दोन्ही धातूंमध्ये घसरण दिसून आली. यामुळे लग्नसराईसाठी दागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला.
विशेष म्हणजे सराफा बाजारात सोन्याला मागणी असताना देखील सोन्याचे दर कोसळले आहेत. जळगावच्या सराफा बाजारात गेल्या काही तासांमध्ये सोन्याचे दर तोळ्यामागे तब्बल दोन हजार रुपयांनी कमी झाले आहेत. तर चादींच्या दरात किलोमागे तब्बल २ हजार रुपयांची घसरण झाली आहे. यानंतर आता २४ कॅरेट सोन्याचा भाव विनाजीएसटी ७७,००० रुपये प्रती तोळ्यावर आले आहेत. दुसरीकडे चांदीचा एक किलोचा भाव विनाजीएसटी ९२,८०० रुपयावर पोहोचले आहे. सोने आणि चांदीचे हे भाव १८ ऑक्टोबरनंतर निच्चांकी पातळीवर पोहोचले आहे.
दरम्यान गेल्या आठवड्यात २४ कॅरेट सोन्याने ८०४०० रुपये तोळे भावाचा (जीएसटीसह ८२८१२) विक्रम तर चांदीने १ लाख रुपयापर्यंत मजल मारली होती. मात्र दिवाळीनंतर दोन्ही धातूंमध्ये घसरण झाली. गेल्या आठवड्याभरात सोने दरात विनाजीएसटी तीन ते साडे तीन हजार रुपयापर्यंतची घसरण झाली तर चांदी दरात तब्बल ८ हजाराहून अधिकची घसरण झाली.
इंडिया बूलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनने (IBJA), गेल्या आठवड्यातच अमेरिकेतील निवडणुक निकालाचा अंदाज, भु-राजकीय तणाव आणि फेडचे संभाव्य व्याज धोरण अशा या अनिश्चिततांच्या पार्श्वभूमीवर सोन्याचे भाव ८० हजारांवर गेले असले तरी यात एक करेक्शनची (घसरण) शक्यता वर्तवली होती. दरम्यान, डॉलर इंडेक्स आणि यूएस बाँड वाढल्याने मौल्यवान धातूच्या किमती कमी झाल्या आहेत.