भारत-कॅनडा तणावाच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात मोठी पडझड

मुंबई : भारत आणि कॅनडा यांच्यातील राजकीय तणावाचे पडसाद देशांतर्गत शेअर बाजारात उमटल्याचे दिसून आले. बुधवारी सेन्सेक्स ५०० अंक घसरून खुला झाला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही २० हजार अंकांच्या खाली आला. शेअर बाजारात व्यवहार सुरू होताच काही बँकिंग आणि आयटी कंपन्यांचे शेअर्स पडले. यामध्ये विप्रो ते इन्फोसिस आणि कोटक महिंद्रा बँक ते आयसीआयसीआय बँकेपर्यंतच्या शेअर्सचा समावेश आहे. महत्त्वाचं म्हणजे, या सर्व कंपन्या त्याच आहेत, ज्यात कॅनडा पेन्शन फंड इन्व्हेस्टमेंट बोर्ड (CPPIN) चे पैसे गुंतवले जातात. मात्र, या शेअर्समध्ये सुरुवातीच्या घसरणीनंतर काहींमध्ये रिकव्हरी नक्कीच दिसून आली.

खलिस्तानी दहशतवाद्याच्या हत्येवरुन कॅनडा आणि भारत यांच्या तणाव निर्माण झाला आहे. ज्याचा परिणाम थेट अर्थव्यवस्थेवरही होणार आहे. यासोबतच कॅनडा पेन्शन फंडानं गुंतवलेल्या कंपन्यांच्या शेअर्सवरही त्याचा परिणाम दिसून येत आहे. आज शेअर बाजार उघडताच, ऑनलाईन पेमेंट सेवा प्लॅटफॉर्म पेटीएमची मूळ कंपनी One 97 Communications Ltd चे शेअर्स 2 टक्क्यांनी घसरले, तर फॅशन ब्युटी ब्रँड Nykaa चे शेअर्सही सुरुवातीच्या व्यवहारात दीड टक्क्यांनी घसरले.

कोणते शेअर्स घसरले?
सकाळच्या सत्रात HDFC बँक, टेक महिंद्रा, टाटा स्टील, भारती एअरटेल, इन्फोसिस, मारुती, कोटक महिंद्रा बँक, एचसीएल टेक, हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेड, रिलायन्स इंडस्ट्रीज, महिंद्रा अँड महिंद्रा, विप्रो, टायटन, बजाज फिनसर्व्ह, बजाज फायनान्स, अल्ट्राटेक सिमेंट, एसबीआयशिवाय नेस्ले इंडिया, आयटीसी, टीसीएस, एनटीपीसी आणि टाटा मोटर्स शेअर्स लाल रंगात रंगलेले दिसून आले. एचडीएफसी बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि इन्फोसिसचे शेअर्स घसरले. HDFC बँकेच्या स्टॉकमध्ये सर्वाधिक घसरण झाली तर रिलायन्सचे शेअर्सही सुमारे दोन टक्क्यांनी खाली आली आहेत.

भारतात कॅनडाची गुंतवणूक
CPPIB ने भारतातील ७० सार्वजनिक कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली असून कोटक महिंद्रा बँकेत त्यांचा २.७% हिस्सा आहे. अशा स्थितीत राजकीय तणावाचे परिणाम कोटक महिंद्रा बँकेच्या शेअर्सवरही दिसून आले जे ०.६०% घसरणीसह १७८६.७० रुपयांवर व्यवहार करत आहेत. त्याचप्रमाणे, क्यूबेकच्या पेन्शन फंडाने गेल्या वर्षाच्या अखेरीस वजनात आठ अब्ज कॅनेडियन डॉलर्सची गुंतवणूक केली असून ओंटारियो शिक्षकांच्या पेन्शन योजनेने भारतात तीन अब्ज कॅनेडियन डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. ऑगस्टअखेर भारतीय बाजारात कॅनडाची गुंतवणूक १.७७ लाख कोटी रुपये असून यातील १.५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक इक्विटी मार्केटमध्ये आहे.