नवी दिल्ली : मोदी सरकारने दिवाळीपूर्वी सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मोठी भेट दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. महागाई भत्ता 4 टक्के वाढून 42 टक्क्यांवरून 46 टक्के करण्यात आला आहे. 1 जुलै 2023 पासून त्याची अंमलबजावणी करण्यात आली आहे.
महागाई भत्ता म्हणजेच DA सरकारी कर्मचाऱ्यांना दिला जातो, तर महागाई सवलत (DR) पेन्शनधारकांना दिली जाते. DA आणि DR वर्षातून दोनदा वाढतात. ज्याचा लाभ त्यांना 1 जानेवारी व 1 जुलैपासून दिला जातो. देशात सुमारे 52 लाख कर्मचारी केंद्र सरकारच्या अंतर्गत काम करतात आणि 60 लाख पेन्शनधारक आहेत, ज्यांना सरकारच्या या निर्णयाचा फायदा होणार आहे. महागाई भत्त्यात वाढ झाल्याने कर्मचाऱ्यांच्या हातातील पगारही वाढतो. सरकार महागाई दराची आकडेवारी लक्षात घेऊन निर्णय घेते. महागाई जितकी जास्त असेल तितकी कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये वाढ अपेक्षित असते.
ऑक्टोबरच्या वेतनात जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्यांच्या थकबाकीचा समावेश असेल. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर डीए वाढवण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे कर्मचारी आणि पेन्शनधारक दोघांनाही फायदा होणार आहे. यापूर्वी मार्च 2023 मध्ये शेवटच्या वाढीमध्ये सरकारने डीए 4 टक्क्यांनी वाढवून 42 टक्के केला होता. केंद्र सरकारने महागाई भत्त्यात वाढ केल्यानंतर राज्य सरकारही आपल्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करणार आहे.