हायलाइट्स:
-
आज सकाळी मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर पहिल्या तीन तासांमधील मतमोजणीचे कल हाती आले आहेत.
-
2. हे कल पाहता मध्य प्रदेश आणि राजस्थानामध्ये भाजपला मोठे यश मिळण्याचे संकेत मिळत आहेत.
-
3. भाजपकडून यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करण्यात आला नव्हता
गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी रविवारी पार पडत आहे. मिझोराम वगळता मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ आणि तेलंगणात निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत आहे. आज सकाळी मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर पहिल्या तीन तासांमधील मतमोजणीचे कल हाती आले आहेत. हे कल पाहता मध्य प्रदेश आणि राजस्थानामध्ये भाजपला मोठे यश मिळण्याचे संकेत मिळत आहेत.
यापूर्वी एक्झिट पोल्सनी राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये काँग्रेस आणि भाजप यांच्यात काँटे की टक्कर पाहायला मिळेल, असा अंदाज वर्तविला होता. मात्र, मतमोजणीच्या सुरुवातीच्या तासांमधील कल पाहता भाजपने राजस्थान आणि मध्य प्रदेशात मोठी आघाडी घेतली आहे
सध्याच्या घडीला राजस्थानमध्ये भाजप १२५ तर काँग्रेस अवघ्या ६२ जागांवर आघाडीवर आहे. तर १२ ठिकाणी इतर पक्ष आघाडीवर आहेत. राजस्थानमध्ये बहुमतासाठी १०० जागांचे बहुमत आवश्यक आहे. त्यामुळे सध्याची स्थिती पाहता राजस्थानमध्ये भाजप सहजपणे सरकार स्थापन करेल, असे चित्र आहे.
तसे घडल्यास राजस्थानमध्ये एकाच पक्षाचे सरकार पुन्हा न येण्याची परंपरा कायम राहील. तर मध्य प्रदेशातही भाजपला मोठे यश मिळताना दिसत आहे. मध्य प्रदेशात भाजपची सरशी होईल, असे अंदाज एक्झिट पोल्सनी यापूर्वीच वर्तविले होते.
हे अंदाज तंतोतंत खरे ठरताना दिसत असून २३० पैकी १३७ जगांवर भाजपने आघाडी घेतली आहे. तर ९२ जागांवर काँग्रेसचे उमेदवार आघाडीवर आहेत. याठिकाणी बहुमताचा आकडा ११६ इतका आहे.
त्यामुळे मध्य प्रदेशातही भाजप सहजपणे सत्तास्थापन करेल, असे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये भाजपकडून यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करण्यात आला नव्हता. राजस्थानमध्ये वसुंधरा राजे तर मध्य प्रदेशात शिवराजसिंह चौहान यांच्यासारख्या बड्या नेत्यांना भाजपने काहीसे साईडलाईन केले होते. स्थानिक नेत्यांना बाजुला सारुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चेहऱ्यावर निवडणकू लढवण्याची भाजपची रणनीती कितपत यशस्वी ठरणार, याबाबत अनेक शंका व्यक्त केल्या जात होत्या.
मात्र, मतमोजणीचे प्राथमिक कल पाहता भाजपची सामूहिक नेतृत्त्वाची रणनीती यशस्वी ठरल्याचे स्पष्ट दिसत आहे. याशिवाय, राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या स्थानिक नेत्यांना बाजुला ठेवून थेट पंतप्रधान मोदी यांचा चेहरा पुढे करुन निवडणुकीला सामोरे जाऊन यश मिळू शकते, या रणनीतीवरील भाजपचा आत्मविश्वास वाढणार आहे.