छत्तीसगडमधील कांकेरमध्ये नक्षलवादी आणि जवानांमध्ये चकमक झाली. या चकमकीत जवळपास 12 नक्षलवादी ठार झाल्याचा पोलिसांचा दावा आहे. कांकेरच्या एसपी इंदिरा कल्याण अलसेला यांनी याला दुजोरा दिला आहे. काही वेळानंतर कांकेर पोलीस प्रेस नोट जारी करून नक्षलवाद्यांची माहिती शेअर केली.
मिळालेल्या माहितीनुसार, आज 1.30 ते 2 वाजण्याच्या दरम्यान कांकेर जिल्ह्यातील छोटाबेटीया भागातील बिनागुंडा आणि कोरोनर दरम्यानच्या हापटोलास जंगलात नक्षलवादी असल्याची माहिती मिळाली. या माहितीवरून डीआरजी आणि बीएसएफच्या संयुक्त दलाने ऑपरेशन सुरू केले. सैनिक येत असल्याचे पाहून नक्षलवाद्यांनी गोळीबार केला. जवानांनीही प्रत्युत्तर दिले. दोघांमध्ये चकमक झाली आणि त्यानंतर नक्षलवादी पळून गेले.
या चकमकीत जवळपास 12 नक्षलवादी ठार झाल्याचं सांगण्यात येत आहे. जवानांनी 12 नक्षलवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे. एरिया कमिटी सदस्य शंकर राव यांच्यासह अनेक बडे नक्षलवादी नेते मारले गेल्याचेही वृत्त आहे. सध्या शोध सुरू आहे.
याशिवाय घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. घटनास्थळावरून नक्षलवाद्यांच्या 7 एके-47, 3 एलएमजी आणि इन्सान रायफल्स जप्त करण्यात आल्या आहेत.