Politics : काँग्रेस पक्षाला एका पाठोपाठ मोठे धक्के बसत आहेत. स्थापना दिनाच्या दिवशीच भाजपने काँग्रेसला धक्का दिला होता. माजी संरक्षणमंत्री ए.के. अँटोनी यांचा मुलगा अनिल अँटोनी यांनी भाजपमध्ये प्रवेश करून काँग्रेसला धक्का दिला होता. अनिल अँटोनी यांना भाजपात प्रवेश देतानाच राहुल गांधी यांच्याविरोधात वायनाड मतदारसंघातुन लोकसभा उमेदवारी देण्याचे भाजपने संकेत दिले आहेत. आता त्यापाठोपाठ आज काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री यांनी भाजपमध्ये प्रवेश करून काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे.
दक्षिण भारतातील आंध्र प्रदेश राज्याचे माजी मुख्यमंत्री किरणकुमार रेड्डी यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. रेड्डी हे अविभाजित आंध्र प्रदेशचे शेवटचे मुख्यमंत्री होते. 2014 साली तेलंगणाची निर्मिती झाली. त्यांनंतर त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता.
मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसला सोड चिट्ठी देत स्वतःचा ‘जय समैक्य आंध्र’ हा पक्ष स्थापन केला होता. मात्र, 2018 मध्ये तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत त्यांनी पुन्हा पक्षात परतीचा मार्ग धरला होता. मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला असला तरी काँग्रेसपासून फारकत घेऊ शकत नाही, असे ते त्यावेळी म्हणाले होते.
सध्या आंध्र प्रदेशमध्ये मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली वायएसआर काँग्रेसची सत्ता आहे. तर, विधानसभा निवडणूकीसाठी एक वर्षाचा कालावधी बाकी आहे. अशावेळी किरणकुमार रेड्डी यांनी पुन्हा काँगेससोबत फारकत घेतली आहे.