तरुण भारत लाईव्ह । १ सप्टेंबर २०२३। घरगुती गॅस सिलेंडरवर दिलासा दिल्यानंतर आता सणासुदीच्या काळात आता व्यवसायिक गॅस सिलेंडरचे दर कमी करण्यात आलेत. ऑगस्ट अखेरीस गॅस सिलेंडरच्या दरात २०० रुपयांची कपात केली. तर आजपासून तेल कंपन्यांनी आता व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरवर मोठा दिलासा दिला आहे.
१९ किलो गॅस सिलिंडरच्या किमतीत १०० रुपयांहून अधिक कपात करण्यात आली. आजपासून १९ किलोचे व्यावसायिक सिलिंडर १५७ रुपयांनी कमी दराने उपलब्ध होतील. नवीन दरानंतर मुंबईत व्यावसायिक सिलिंडरची किंमत आता १४८२ रुपये झाली आहे, जी पूर्वी १६४०.५० रुपये होती. अशा परिस्थितीत आता रेस्टॉरंट मालकांना तसेच मिठाई बनवणाऱ्यांना सणासुदीच्या काळात दर कपातीचा सर्वाधिक फायदा होईल. गॅसच्या किंमती कमी झाल्यामुळे वस्तूंच्या किंमतीही कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना किंमतीतील कपातीचा जास्त फायदा मिळेल. सरकारकडून १० कोटी लाभार्थ्यांना २०० रुपये अनुदान आधीच दिले जात असताना उज्ज्वल योजनेच्या लाभार्थ्यांना मिळणारा फायदा ४०० रुपये प्रति सिलेंडर झाला आहे. म्हणजेच नवीन बदलानंतर त्यांना सिलिंडरसाठी ९०३ रुपये मोजावे लागतील आणि २०० रुपयांची सबसिडी मिळेल, त्यामुळे त्यांना प्रति सिलिंडरसाठी ७०३ रुपये मोजावे लागतील.