मुंबई : माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणार्या दहावी-बारावीच्या परीक्षेला विद्यार्थ्यांना दिलेल्या वेळेतच परीक्षा केंद्रात उपस्थित राहावे लागणार आहे. उशिरा येणार्या विद्यार्थांना प्रवेश मिळणार नाही. उशिरा पोहचण्याच्या सवलतीचा विद्यार्थी गैरफायदा घेत असल्याचे बोर्डाच्या निदर्शनास आल्यामुळे बोर्डाने हा कडक निर्णय घेतला आहे. या संदर्भातील पत्र देखील मंडळाने सर्व शाळांना पाठवले आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षा यंदा २१ फेब्रुवारी ते २५ मार्चदरम्यान घेतली जाणार आहे. सकाळच्या सत्रात ११ वाजता तर दुपारी ३ वाजता अशी पेपरची वेळ आहे. आतापर्यंत अपवादात्मक परिस्थितीत १० मिनिटे उशीर झाला असला तरी, विद्यार्थ्यांना पेपरला परवानगी देण्यात येत होती. परंतु राज्य मंडळाने उशिरा येणार्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्याचे आदेश केंद्रांना दिले आहेत. परीक्षेसाठी आता विद्यार्थ्यांनी सकाळी साडे दहा तर दुपारी अडीच वाजता उपस्थित राहणे अनिवार्य आहे.
उशीरा येण्याच्या सवलतीचा लाभ घेऊन लेखी परीक्षेस उशिरा येणार्या विद्यार्थ्यांच्या मोबाइलमध्ये प्रश्नपत्रिकेतील आशय असल्याचे निदर्शनास आले आहे. याची मंडळाने दखल घेऊन कारवाई केली. परंतु या गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी बोर्डाने पत्रक जारी केले आहे. सर्व संबंधित विद्यार्थ्यांनी परीक्षेला वेळेत हजर राहणे आवश्यक आहे. गैरप्रकारांवर प्रतिबंध घालण्यासाठी बोर्डाने परिपत्रक पाऊल उचलले आहे.