मोठी बातमी : संसदेतील घुसखोरीच्या घटनेचे धागेदोरे कल्याणपर्यंत पोहोचले
—
कल्याण: देशाचे सर्वोच्च सभागृह असलेल्या संसदेत घुसखोरी करणाऱ्या तरुणांनी फोडलेल्या रंगीत धुराच्या नळकांड्या त्यांनी कल्याणमधून खरेदी केल्याची माहिती मिळताच गुप्तचर यंत्रणेची शोधमोहीम सुरू झाली आहे. स्थानिक पोलिस याबाबत अनभिज्ञ असून आपल्याला याबाबत कोणतीही माहिती किंवा संपर्क करण्यात आला नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या निमित्ताने कल्याण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.
नुकत्याच झालेल्या दिवाळी सणानिमित्त शहराच्या अनेक भागांत फटाक्यांच्या स्टॉलना परवानगी देण्यात आली होती. शिवाय अनेक विक्रेते अनधिकृतपणे फटाक्यांची विक्री करीत होते. मोठ्या आवाजाच्या फटाक्यांवर बंदी असल्याने कमी आवाजाचे किंवा आवाजविरहित हवेत रंग उडविणाऱ्या फटाक्यांना यंदा मोठी मागणी होती. मात्र, फटाके विक्रेते खरेदीदारांची कोणतीही नोंद ठेवत नसल्यामुळे या तरुणांनी नेमके फटाके कोणाकडून घेतले हे शोधण्याचे आव्हान गुप्तचर यंत्रणेसमोर असणार आहे.
संसदेत घुसखोरी केल्यानंतर पकडल्या गेलेल्या तरुणांपैकी एकाने या रंगीत धुराच्या नळकांड्या कल्याणमधून खरेदी केल्याचे सांगितल्याने आधीच गुन्हेगारीसाठी बदनाम असलेल्या कल्याण शहरावर आणखी एक शिक्का बसला आहे. कल्याण पूर्व हे अनेक तडीपार गुन्हेगारांचे आश्रयस्थान असल्याचा अहवाल राष्ट्रीय तपास संस्थेकडे (एनआयए) असून, त्या दृष्टीने त्यांचा तपास सुरू असल्याची माहिती काही अधिकाऱ्यांनी दिली.