ISRO ला NASA कडून मोठी ऑफर, वाचा सविस्तर

नवी दिल्ली : अमेरिकन स्पेस एजन्सी NASA नं भारतीय अंतराळ संस्था ISRO ला मोठी ऑफर दिली आहे. भारताला अंतराळ स्टेशन बनवण्यासाठी नासाकडून सहकार्य करण्याची तयारी दाखवली आहे. नासाचे प्रशासकीय संचालक बिल नेल्सन यांनी याबाबत भाष्य केले. भारत आणि अमेरिका पुढील वर्षाच्या अखेरीपर्यंत भारतीय अंतराळवीराला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशनला पाठवण्याचे प्लॅनिंग करत आहे. या अंतराळवीराची निवड नासा करणार नाही. त्याची निवड इस्त्रोद्वारे करण्यात येईल, असं नेल्सन यांनी म्हटलं आहे.

भारताच्या दौऱ्यावर आलेल्या बिल नेल्सन यांनी मंगळवारी विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंह यांची भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये अंतराळाशी निगडीत अनेक योजनांवर प्रदीर्घ चर्चा झाली. एका प्रश्नाला उत्तर देताना नेल्सन यांनी भारताच्या अंतराळ स्टेशन निर्मितीसाठी मदत करण्याची पूर्ण तयारी अमेरिकेची आहे असं त्यांनी म्हटलं.

त्याचसोबत भारताकडेही कमर्शियल स्पेस स्टेशन असावं ही अपेक्षा आहे. मला वाटतं, २०४० पर्यंत भारत कमर्शियल स्पेस स्टेशन बनवेल. जर भारताला आमच्या सहकार्याची गरज असेल तर निश्चिपणे आम्ही ते करू. परंतु हे भारतावर निर्भर आहे असं अमेरिकेने म्हटलं. तर पंतप्रधान मोदी यांनी इस्त्रोला २०३५ पर्यंत इंडियन स्पेस स्टेशन बनवण्यासाठी आणि २०४० पर्यंत चंदावर अंतराळवीर उतरवण्याचे ध्येय गाठण्यास सांगितले आहे.