मुंबई : केंद्र सरकारने कांदा निर्यात शुल्क 40 टक्के वाढविल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत रस्त्यावर कांदे फेकत केंद्र सरकारच्या या निर्णयाचा निषेध शेतकऱ्यांनी अनेक ठिकाणी नोंदविला. दरम्यान, शेतकऱ्यांची समस्या सोडविण्यासाठी राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिल्ली गाठली आहे. मुंडे आणि पियुष गोयल यांची चर्चा होत नाही तोवर देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून केंद्र सरकार २ लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करणार असल्याची घोषणा केली आहे.
ट्विटमध्ये फडणवीस यांनी म्हटलं आहे की, गृहमंत्री अमित शाह आणि पीयुष गोयल यांच्याशी मी फोनवरून संपर्क साधला आहे. केंद्र सरकारने 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला असून महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांचे हित जपण्यासाठी नाशिक आणि अहमदनगर येथे विशेष खरेदी केंद्र सुरू करण्यात येतील, अशी घोषणा त्यांनी केली आहे.
केंद्र सरकार 2410 रुपये प्रति क्विंटल दराने कांदा खरेदी करणार आहे. याचा फायदा राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना होणार असल्याचे फडणवीस म्हणाले. नाफेडने तीन लाख टन कांदा ११ ते १५ रुपये प्रति किलोने कांदा खरेदी केला आहे. यापुढील कांदा हा विक्रमी दराने खरेदी केला जाणार आहे. मी केंद्राला दोन लाख टनांपेक्षाही जास्त कांदा आला तर तो देखील याच दराने खरेदी करावा अशी मागणी केली आहे, असे धनंजय मुंडे म्हणाले.