शरद पवारांना मोठा दिलासा! निवडणूक आयोगाने केली ही विनंती मान्य

नवी दिल्ली : अलीकडेच राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्ष म्हणून असलेला दर्जा केंद्रीय निवडणूक आयोगाने काढून घेतला. यातच कर्नाटकातील विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसकडून घेण्यात आला. या घडामोडींमध्ये आता केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसने केलेली विनंती मान्य केल्याचे सांगितले जात आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना दिलासा मिळाल्याचे म्हटले जात आहे.

कर्नाटक विधान सभा निवडणुकीचा बिगूल वाजला आहे. सर्वच पक्ष कंबर कसून कामाला लागले आहेत. खरे तर भारतीय जनता पक्ष, काँग्रेस आणि जेडीएसमुळे ही निवडणूक आधीच तिरंगी झाली होती. मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या एन्ट्रीमुळे ही निवडणूक अधिकच चुरशीची होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस कर्नाटकातील २२४ विधानसभा जागांपैकी ४० ते ४५ जागा लढवणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस कर्नाटक विधानसभा निवडणूक घड्याळ चिन्हावर लढणार आहेत. पक्षाकडून विनंती केल्यानंतर निवडणूक आयोगाने निर्णय घेतला आहे.राष्ट्रवादीचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गेल्यानंतर कर्नाटक निवडणूक कोणत्या चिन्हावर निवडणुका लढणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष होते. अखेर निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा दिलासा मिळाला आहे.