मुंबई : देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीने राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली होती. या शपथविधी बाबतच्या अनेक प्रश्नांची उत्तरे अजूनही उलगडलेली नाहीत. हा शपथविधी शरद पवारांच्या परवानगीने झाला होता का? याची उत्सूकता संपूर्ण महाराष्ट्राला लागून आहे. मात्र सध्या अजित पवार गटात असलेले नेते सुनिल तटकरे यांनी याच पहाटेच्या शपथविधीवर महत्त्वाची विधानं केली आहेत. ते एका खासगी वृत्तवाहिनीने आयोजित केलेल्या मुलाखतीत बोलत होते.
सुनिल तटकरे म्हणाले की, भाजपा आणि शिवसेना एकत्र सरकार स्थापन करणार नाहीत, हे स्पष्ट झाल्यानंतर त्या वेळेला वेगवेगळ्या पर्यायांचा विचार केला जाऊ लागला. यामध्ये राष्ट्रवादी आणि भाजपा यांचे थेट सरकार किंवा महाविकास आघाडीच्या पर्यायावर विचार केला जाऊ लागला. आमच्यापुढे दोन पर्याय होते. आम्ही दोन्ही पर्याय खुले ठेवले होते. ही चर्चा पक्षनेतृत्वाच्या संमतीनेच होत होती, असा दावा तटकरे यांनी केला.
“त्या १५ ते २० दिवसांमध्ये अनेक घडामोडी घडत होत्या. दिल्लीमध्ये काही बैठका झाल्या. मुंबईला चव्हाण सेंटरमध्येही बैठक झाली होती. मात्र महाविकास आघाडीच्या दृष्टीने या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली नाही. त्याच्यानंतरच अनेक घडामोडी घडल्या आणि सकाळची शपथ झाली,” असे सुनिल तटकरे यांनी सांगितले.
“अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली तेव्हा सकाळचे ८ वाजले होते. पहाटेचा शपथविधी म्हणून अजित पवार यांच्यावर अन्याय होतो. सकाळच्या लख्ख प्रकाशात त्यांनी शपथ घेतली होती. या शपथेबाबतच्या अनेक प्रश्नांची उत्तरं काळाच्या ओघात मिळतील. काळ हेच त्या प्रश्नांवर उत्तर आहे,” असे देखील सुनिल तटकरे म्हणाले.