अंबरनाथ : अंबरनाथमधील ठाकरे गटाचे जवळपास सर्वच पदाधिकारी हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. आज हे पदाधिकारी राजीनामे देण्याची शक्यता असून यापुढे अंबरनाथमध्ये एकच शिवसेना असेल, अशी माहिती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे. त्यामुळे ठाकरे गटाच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या या निर्णयाने उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसल्याचे मानला जात आहे.
अंबरनाथचे ठाकरे गटाचे शहरप्रमुख श्रीनिवास वाल्मिकी यांच्यासह सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी रविवारी रात्री उशिरा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली. या भेटीत सर्वच पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. यानंतर खासदार शिंदे यांनीही यापुढे अंबरनाथ शहरात एकच शिवसेना असेल, आणि पूर्वीप्रमाणे सगळे एकत्र काम करतील, अशीही प्रतिक्रिया खासदार शिंदे यांनी दिली.
दरम्यान, अंबरनाथमधील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत सामील होण्याच्या निर्णयानंतर शाखेतील उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो बाहेर काढले आहेत. त्यामुळे अंबरनाथमध्ये ठाकरे गटाचे उरले सुरले पदाधिकारी शिवसनेत गेल्याने त्या भागात ठाकरे गटाचे अस्तित्व जवळपास संपुष्टात आल्याचे पाहायला मिळत आहे.